जळवात – Cracked Heels :

तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. जळवात आजाराला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते. येथे जळवात का होतो व जळवातवरील उपायांची माहिती खाली दिली आहे.

जळवात होण्याची कारणे – Cracked Heels causes

जळवात होण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये,
• अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे,
• अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे,
• आरामदायी चपला, सँडल किंवा बूट न वापरण्यामुळे,
• हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पायाची त्वचा कोरडी (dry skin) झाल्यामुळे,
• जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,
• पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे,
• व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे,
• डायबेटीस, हायपो-थायरॉईडीजम, लठ्ठपणा, सोरायसिस, त्वचेचे विकार यासारखे त्रास असल्यासही जळवात होऊन तळपायाला भेगा पडण्याची समस्या होत असते.

जळवाताची लक्षणे :

जळवात मध्ये तळपायाला भेगा पडतात. त्याठिकाणची त्वचा फाटते, त्वचा रुक्ष व खडबडीत होते. काहीजणांना जळवातमुळे तळपायाला भेगा पडून त्याठिकाणी जखमा, वेदना व रक्तस्राव होणे असे त्रासही होत असतात.

जळवातवर हे करा घरगुती उपाय – Cracked Heels home remedies :

मध –
जळवातमध्ये पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी मधातील अँटी-मायक्रोबियल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खूप उपयुक्त ठरतात. तसेच त्वचा मॉइश्चराइज होण्यासाठीही मध उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे. यामुळे पायाच्या भेगा व जखमा दूर होण्यास मदत होते.

खोबरेल तेल –
खोबरेल तेलातील विशेष गुणधर्मामुळे त्वचा मॉइश्चराइज होत असते. त्यामुळे जळवातामुळे पायाला भेगा पडल्यास तेथे खोबरेल तेल लावावे. यामुळे भेगा भरून येण्यास व भेगा पडलेली डेड स्किन निघून जाण्यास, त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.

कडुनिंबाचा रस –
जळवातमध्ये पायाला भेगा पडल्यास कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून लावल्यास भेगा लवकर कमी होतात.

हळद –
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जळवातामुळे तळव्यांना झालेल्या जखमा भरून येण्यास मदत होते. यासाठी हळदीमध्ये कोमट तेल टाकून मिश्रण तयार करून ते भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.

जळवातवरील औषध उपचार – Cracked Heels treatments :

जळवातमुळे पायाला भेगा पडल्यास त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. त्यामुळे भेगा पडलेली त्वचा मॉइश्चराइज होऊन डेड स्किन निघून जाते व त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.

Heelmate cracked heel क्रीम सारख्या अनेक चांगल्या क्रीम्स जळवातसाठी मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. जास्त प्रमाणात पायाला भेगा पडल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा क्रीम त्याठिकाणी लावावी.

जळवातमध्ये अशी घ्यावी काळजी :

• अनवाणी पायी चालणे टाळावे.
• बाहेर फिरताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
• पायांचे तळवे व टाचा यांना योग्य Support देणारे व आरामदायी असणारे चपला वापराव्यात.
• पायांना जास्त टाईट होणारे बूट वापरू नयेत.
• अधिक काळ उभे राहणे टाळावे.
• दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहून त्वचा कोरडी (ड्राय स्किन) पडत नाही.
• मॉइश्चराइजिंग सॉक्स (cracked heels socks) बाजारात उपलब्ध असून त्यांचाही वापर यावर उपयोगी ठरतो.

जळवात असल्यास कोणी जास्त काळजी घ्यावी..?

जळवात किंवा पायाला भेगा पडणे हा तसा सामान्य त्रास असला तरीही डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पायाला भेगा पडणे याकडे दुर्लक्ष केल्यास त्याठिकाणी जखमा वाढून डायबेटिक न्युरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. डायबेटीसविषयी माहिती वाचा..

त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांनी जळवातात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी आपल्या डॉक्टरांकडून त्यावर उपचार घ्यावेत तसेच पायाची नियमित तपासणीही करून घ्यावी.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...