गर्भावस्थेत छातीत जळजळणे (Acidity) :
अनेक महिलांना गरोदरपणात ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या होत असते. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ही समस्या होते. शेवटच्या तीन ते चार महिन्यात अनेक स्त्रियांना याचा त्रास होत असतो या त्रासाचा कोणताही विपरीत परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत नाही.
गरोदरपणात छातीत जळजळ होणे यावरील उपाय :
1) चुकीचा आहार टाळावा..
गर्भावस्थेत तिखट व मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, सोडायुक्त कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, चहा, कॉफी असे पदार्थ खाणे टाळावे. वरील सर्व पदार्थांमुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास होत असतो.
2) योग्य आहार घ्यावा..
पचनास हलका असणारा आहार घ्यावा. वरण, भात, भाजी, विविध फळे, दूध व दुधाचे पदार्थ यांचा आहारात समावेश करावा. तसेच पाणीही दिवसभरात वरचेवर प्यावे. वेळच्यावेळी आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. यापेक्षा दिवसातून 3 ते चार वेळा थोडे थोडे खावे. यामुळे पचन व्यवस्थित होऊन ऍसिडिटी होत नाही. जेवण घेतल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण घेतल्यावर लगेच झोपल्यास अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही.
3) सैल व आरामदायक कपडे वापरावीत..
गरोदरपणी सैल व आरामदायक कपडे घालावेत. जास्त घट्ट असलेल्या कापड्यांमुळे पोट आणि छातीवर अनावश्यक दाब येत असतो.
ऍसिडिटीवर औषधे घेताना अशी घ्यावी काळजी :
आपल्या डॉक्टरांकडून ऍंटासिडच्या गोळया घ्याव्यात. यामुळे छाती व पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. मात्र ऍंटासिडच्या गोळया आणि लोहाच्या गोळ्या एकत्र घेऊ नयेत. कारण अशाप्रकारे लोहाच्या गोळ्या घेतल्यास ते आपल्या शरीरात योग्यप्रकारे अवशोषित होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी ह्या दोन्हीही गोळ्या घ्याव्यात.
हे सुद्धा वाचा – गरोदरपणात घ्यावयाची काळजी
Read Marathi language article about Acidity During Pregnancy; Causes and Treatment. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.