प्री-एक्लेम्पसिया (Preeclampsia) :
प्रेग्नन्सीमध्ये अनेक गरोदर स्त्रियांना Pre-eclampsia (प्री-एक्लेम्पसिया) ही गंभीर समस्या होत असते. यामुळे गर्भवती आणि पोटातील बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. यासाठी Pre-eclampsia वर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक असते. भारतात साधारण 10% गरोदर स्त्रियांमध्ये ही स्थिती निर्माण होऊ शकते.
प्री-एक्लेम्पसिया कारणे (Preeclampsia Causes) :
गरोदरपणात जेंव्हा अपरा (प्लेसेंटा) योग्यरीत्या काम करीत नाही तेंव्हा ही स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे प्लेसेंटातील रक्तप्रवाह कमी होतो. पर्यायाने गर्भाशयातील बाळास पुरेशा प्रमाणात पोषकघटक आणि ऑक्सिजन मिळत नाही. अशाप्रकारे प्रीक्लेम्पसिया यामुळे बाळाला धोका निर्माण होतो.
प्री-एक्लेम्पसिया लक्षणे (Preeclampsia Symptoms) :
गर्भवती महिलेच्या पायांवर, हातांवर, चेहऱ्यावर खूप सूज येणे व ब्लडप्रेशर खूप वाढलेला असणे अशी प्रमुख लक्षणे यात असतात.
- प्रेग्नंट स्त्रिच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे,
- वजनात अवाजवी वाढ होणे,
- ब्लडप्रेशर वाढलेला असणे,
- लघवीमध्ये अलबुमीन (प्रोटीनचा प्रकार) आढळून येतो.
काही महिलांमध्ये डोके दुखू लागते, जळजळ वाढू लागते, अस्वस्थता वाढते, डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागतात. ही सर्व लक्षणे हा आजार जास्त तीव्र स्वरूप धारण करतोय हे दर्शवितात.
प्री-एक्लेम्पसियाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या व लघवीची तपासणी केली जाते. याशिवाय गरोदर स्त्रीचा रक्तदाब, वजन तपासले जाते. त्यावरून Preeclampsia चे निदान केले जाते.
प्री-एक्लेम्पसिया उपचार (Preeclampsia Treatment) :
प्री-एक्लेम्पसियाची स्थिती असल्यास ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे ही महत्त्वाची उपचार पद्धती असते. याशिवाय विश्रांती हेसुद्धा खूप महत्त्वाचे असते. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यासाठी गोळ्यांचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या परवानगी किंवा सल्ल्याशिवाय गोळीत बदल करू नये. याशिवाय आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते.
Pre-eclampsia मध्ये वरचेवर डॉक्टरांकडे ब्लडप्रेशर व लघवीची तपासणी करून आजाराची तीव्रता तपासली जाते. व्यवस्थित काळजी न घेतल्यास याची तीव्रता वाढते व झटके येऊ शकतात. त्या स्थितीस ‘एक्लेमप्सिया’ म्हणतात. ही स्थिती अर्थातच खूप गंभीर असते. यामध्ये बाळ दगावण्याची शक्यता असते तसेच उपचार वेळेवर न झाल्यास गर्भवती मातेच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते.
Read Marathi language article about Preeclampsia Symptoms, Causes and Treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.