Dr Satish Upalkar’s article about Monkeypox in Marathi.

मंकीपॉक्स म्हणजे काय – Monkeypox in Marathi :

मंकीपॉक्स हा विषाणूमुळे होणारा दुर्मिळ असा संसर्गजन्य रोग आहे. या आजारात ताप येणे, अंग दुखणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि त्वचेवर पुरळ येणे असे त्रास होतात. याच्या पुरळामुळे चेहऱ्यावर आणि हातापायांवर फोड येऊन जखमा होतात. मंकीपॉक्स हा एक झुनोटिक रोग असून याचा प्रसार प्राण्यांपासून मानवांमध्ये होत असतो. तसेच मंकीपॉक्सने बाधित झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या स्वस्थ व्यक्तीमध्येही याची लागण होऊ शकते. मंकीपॉक्सची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार याबद्दल माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.

Causes, Symptoms, Treatments & Meaning of Monkeypox In Marathi by Dr Satish Upalkar.

मंकीपॉक्स आजाराचा इतिहास –

संशोधकांना 1958 मध्ये पहिल्यांदा मंकीपॉक्स ह्या रोगविषयी माहिती ज्ञात झाली. वैद्यकीय संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या माकडांमध्ये याचा प्रादुर्भाव पहिल्यांदा आढळून आला. म्हणूनच या आजाराला ‘मंकीपॉक्स’ या नावाने ओळखले जाते. 1970 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये, मानवात पहिल्यांदा मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळले. मंकीपॉक्स आजार हा माकड, वानर, उंदीर, ससा, खार आणि मानव अशा प्राण्यांमध्ये आढळून आला आहे. मंकीपॉक्स हा आजार प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो.

मंकीपॉक्स आजाराची कारणे – Monkeypox Causes in Marathi :

मंकीपॉक्स हा आजार ‘मंकीपॉक्स’ या विषाणूमुळे होतो. मंकीपॉक्सचे विषाणू हे ऑर्थोपॉक्स (orthopoxvirus) ह्या ह्या व्हायरसच्या कुळातील असतात. आणि ह्याच कुळातील विषाणूपासून स्मॉलपॉक्स ह्या आजाराचीसुध्दा लागण होत असते.

मंकीपॉक्स कसा पसरतो?

मंकीपॉक्स विषाणूने बाधित झालेल्या व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्याने मंकीपॉक्स हा आजार पसरतो. बाधित व्यक्ती किंवा प्राण्याचे रक्त, शरीरातील द्रव, श्लेष्मल स्त्राव, शिंका, खोकला, श्वसन, त्वचेवरील जखमा, प्राण्यांचा चावा यातून मंकीपॉक्सच्या व्हायरसचा प्रसार दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्याला होत असतो. याव्यतिरिक्त मंकीपॉक्सने बाधित झालेल्या प्राण्याचे कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाल्यानेदेखील ह्या आजाराची लागण होऊ शकते. अशाप्रकारे मंकीपॉक्स हा रोग पसरत असतो.

मंकीपॉक्सची लक्षणे – Monkeypox Symptoms in Marathi :

मंकीपॉक्सची लक्षणे ही ‘स्मॉलपॉक्स’ सारखीच असतात. मंकीपॉक्स विषाणूचे इन्फेक्शन झाल्यानंतर, पहिली लक्षणे दिसण्यासाठी 5 ते 21 दिवस लागू शकतात. ह्याची लागण झालेल्या बऱ्याच व्यक्तींमध्ये साधारण 7 ते 14 दिवसात लक्षणे दिसून आलेली आहेत.

मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.

  • ताप येणे,
  • डोकेदुखी,
  • स्नायू दुखणे,
  • पाठदुखी,
  • थकवा जाणवणे,
  • थंडी वाजून येणे,
  • लिम्फ नोड्स सुजणे अशी सुरवातीला लक्षणे दिसून येतात.

ही लक्षणे दिसून आल्यानंतर साधारण 1 ते 3 दिवसांनी अंगावर पुरळ उठते. पुरळ हे प्रामुख्याने चेहरा, हाताचे व पायाचे तळवे, तोंड, जननेंद्रिय, डोळे अशा ठिकाणी उठतात. ह्या पुरळामुळे अंगावर फोड व जखमा होत असतात. जखममध्ये पिवळसर द्रव पदार्थ दिसून येतो.

त्वचेवरील जखमा काही दिवसात सुकतात, जखमांच्या ठिकाणी खपल्या धरतात व त्रास कमी होऊ लागतो. म्हणजे मंकीपॉक्सची लक्षणे ही साधारण 2 ते 4 आठवडे टिकतात आणि त्यानंतर उपचाराशिवाय मंकीपॉक्स आजार बरा होतो.

मंकीपॉक्सचे निदान – Monkeypox Diagnosis test :

एखाद्या व्यक्तीस मंकीपॉक्सची लागण झाली आहे की नाही याचे निदान करण्यासाठी, डॉकटर संबधित व्यक्तीची मेडिकल हिस्ट्री, सध्या असणारी लक्षणे तपासतील. याशिवाय त्याच्या अंगावरील जखमातील द्रव्याचा नमुना लॅबमध्ये पाठवला जातो. तसेच काहीवेळा जखमाचा तुकडा घेऊन तो बायोप्सी परिक्षणासाठी लॅबमध्ये पाठवला जातो. अशाप्रकारे मंकीपॉक्सचे निदान केले जाते.

मंकीपॉक्स वरील उपचार – Monkeypox treatment in Marathi :

मंकीपॉक्स विषाणूवर सध्या कोणताही ठोस असे उपचार उपलब्ध नाहीत. बहुतेक रुग्ण हे कोणत्याही उपचारांशिवाय बरे होत असतात. मंकीपॉक्सच्या उपचारांमध्ये अँटीव्हायरल औषधे, स्मॉलपॉक्सची लस, व्हॅक्सिनिया इम्यून ग्लोब्युलिन (VIG) यांचा समावेश करू शकतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, स्मॉलपॉक्सच्या लसीमुळे मंकीपॉक्स आजाराची वाढ 85 टक्यानी रोखण्यास मदत होऊ शकते. लहानपणी स्मॉलपॉक्सची लस घेतलेल्या लोकांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची लक्षणे ही इतरांच्या तुलनेत सौम्य असतात.

मंकीपॉक्स पासून बचाव कसा करावा?

  • परिसरात मंकीपॉक्सचा उद्रेक झाला असल्यास अधिक काळजी घ्यावी.
  • मास्क आणि sanitizer यांचा वापर करावा.
  • बाहेरून आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • मंकीपॉक्स बाधित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाताना अधिक काळजी घ्यावी.
  • मंकीपॉक्स बाधित असलेल्या व्यक्तीची काळजी घेताना मास्क, sanitizer आणि हातमोजे यांचा वापर करावा.
  • आजारी किंवा मृत प्राण्याच्या संपर्कात येणे टाळावे.
  • प्राण्यांचे कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाणे टाळावे.
  • ताप येणे, अंगदुखी अंगावर पुरळ येणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
  • मंकीपॉक्स हा आजार 2 ते 4 आठवड्यात आपोआप बरा होत असतो त्यामुळे या आजाराविषयी अधिक भयभीत होऊ नये.

हे सुध्दा वाचा – चिकनपॉक्स (कांजण्या) विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
4 Sources

In this article information about Monkeypox Meaning, Causes, Symptoms, Diagnosis test, Treatments and Prevention tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...