इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या –
अनावश्यक गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. असे असूनही अनेकदा पुरेशी खबरदारी न घेतल्याने अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यताही असते.
विशेषतः लैंगिक संबंधामध्ये कंडोमसारख्या साधनांचा वापर न करणे, किंवा सेक्समध्ये कंडोम फाटणे, नियमित घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास विसरणे किंवा कॉपर टी गर्भाशयातून गळून पडणे अशा स्थितीत अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी नको असलेली प्रेग्नन्सी रोखण्यासाठी ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स’चा उपयोग होतो.
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर कसा व कधी करावा..?
गर्भधारणा होऊ नये यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या सेक्सनंतर लवकरात लवकर घेणे आवश्यक असते. अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रियानी याची गोळी सेक्सनंतर 72 तासांच्या आत घेणे आवश्यक असते. या गोळ्यांच्या प्रभावामुळे अनावश्यक गर्भधारणा रोखण्यास मदत होते.
नियमितपणे वापरायच्या गर्भनिरोधक गोळ्या आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या यांमध्ये फरक असतो का..?
नियमित वापरायच्या गर्भनिरोधक गोळ्या आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या यामध्ये निश्चितच फरक असतो. नियमित वापरायच्या गर्भनिरोधक गोळ्या पाळीच्या पाचव्या दिवसापासून रोज एक गोळी याप्रमाणे 28 दिवस घ्यायच्या असतात. या गोळ्यांतील 21 गोळ्या ह्या हॉर्मोन्स असणाऱ्या आणि 7 गोळ्या लोहाच्या असतात. 28 दिवसाच्या गोळ्या संपल्या की 1 ते 2 दिवसात पाळी येते. या गोळ्या रोज न विसरता नियमित घेणे आवश्यक असते.
तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर ‘इमर्जन्सी’ मध्येच कधीतरी होणे आवश्यक असते. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या महिन्यातून एक ते दोनवेळाच वापरणे योग्य असते. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर सतत करणे धोकादायक असते.
i-Pill गोळ्या घेतल्याने गर्भपात होतो का..?
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या गर्भपात करू शकत नाहीत. सेक्सनंतर लगेच गर्भधारणा होऊ नये यासाठीच फक्त या गोळ्यांचा वापर होतो. गर्भधारणा झाली असल्यास, पोटात गर्भ वाढत असल्यास या गोळ्यांचा काहीही उपयोग होत नाही.
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा किंवा i-Pill चा मासिक पाळीवर काही परिणाम होतो का..?
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर केल्यास पुढे येणारी मासिक पाळी थोडी लवकर किंवा उशिरा येऊ शकते. या गोळ्यांच्या सतत व चुकीच्या वापराने मासिक पाळीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर केल्याने लैंगिक आजार टाळले जातात का..?
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या ह्या सेक्सनंतर तात्काळ गर्भधारणा होणे रोखण्यासाठीचं फक्त उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा गोळ्यांचा वापर केल्याने लैंगिक आजार टाळले जात नाहीत. एचआयव्ही, सिफिलिस सारखे लैंगिक आजार होऊ नये यासाठी कंडोम वैगेरे गर्भनिरोधक साधनेचं वापरणे आवश्यक असते.
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा सतत वापर करणे योग्य आहे का..?
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर ‘इमर्जन्सी’ मध्येच कधीतरी होणे आवश्यक असते. कारण या गोळ्यांच्या चुकीच्या वापराचा दुष्परिणाम स्त्रियांचा आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या महिन्यातून एक ते दोनवेळाच वापरणे योग्य असते. या गोळ्यांचा सततचा वापर हा धोकादायक असतो. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांच्या चुकीच्या वापराने मासिक पाळीचे चक्र बिघडून मासिक पाळी अनियमित होतो. स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करावा.
Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.