गुळ – Jaggery :

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे.

गुळ खाण्याचे हे आहेत फायदे :

हिमोग्लोबिन वाढवते..
ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.

स्त्रियांसाठी उपयुक्त..
सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते. कारण मासिक पाळी, अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते. यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीनंतरही गूळ हितकारी असतो.

रक्तदाब नियंत्रित ठेवतो..
गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

पचनशक्ती सुधारते..
गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गूळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करते..
गूळ खाण्यामुळे आपल्या यकृतातील अपायकारक विषारी घटक दूर होण्यास (लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होण्यास) मदत होते.

आयुर्वेदानुसार गुळाचे महत्व आणि गुळाचे फायदे :

आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधेही गुळाबरोबर दिली जातात. आयुर्वेदातही गुळ खाण्याचे फायदे अनेक सांगितले आहेत. गुळ हे वातनाशक असून गुळ सुंठीबरोबर खाल्ल्यास वाताचे शमन होऊन मज्जावह संस्थेला म्हणजे नर्व्हस सिस्टीमला बल देते. जुना गुळ खाल्यास कफनाशनाचे कार्य होते. गुळामुळे दमा, खोकला यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते. शरीरातील थकवा दूर करण्यासही गुळ उपयोगी ठरते.

साखर खाणे चांगले की गुळ खाणे चांगले..?

साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो.

तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन-B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळचं खाणे हितकारक असते.

गुळ खाण्यामुळे होणारे नुकसान :

• अधिक प्रमाणात गुळ खाण्यामुळे वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृद्यविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
• गूळ अधिक खाण्यामुळे पोटात जंत होण्याचा त्रास होऊ शकतो.
• आमवात किंवा rheumatoid arthritis चा त्रास असल्यास गुळ खाणे टाळावे. कारण यात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने या त्रासात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते.
• गुळ अधिक खाण्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गूळ अधिक खाणे टाळावे. मधुमेह असणाऱ्यानी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचा समावेश करावा. येथे क्लिक करा व डायबेटीसविषयी अधिक माहिती वाचा..

गुळ खाताना अशी घ्यावी काळजी :

गुळात अनेक पोषकघटक असले तरीही गुळ अधिक प्रमाणात खाणे टाळावे. योग्य प्रकारे साठवणूक केलेले गूळ खाण्यास वापरावे. बुरशी आलेले गुळ खाऊ नये.
आयुर्वेदाने गुळ आणि मासे एकत्र खाऊ नयेत असे सांगितले आहे. अशाप्रकारे गुळ खाताना ही काळजी घ्यावी.

गुळातील पोषक घटक :

अर्धा कप किंवा 100 ग्रॅम गुळामध्ये खालील पोषकद्रव्ये असतात.
कॅलरीज – 383
सुक्रोज – 65 ते 85 ग्रॅम
फ्रक्टोज आणि ग्लुकोज – 10 ते 15 ग्रॅम
प्रोटीन्स – 0.4 ग्रॅम
फॅट (चरबी) – 0.1 ग्रॅम
लोह – 11 मिग्रॅ (61% of RDI)
मॅग्नेशियम – 70 ते 90 मिग्रॅ ( 20% of RDI)
पोटॅशियम – 1050 मिग्रॅ (30% of RDI)
मॅंगनीज – 0.4 mg मिग्रॅ (10% of RDI)

पण आपण एका दिवसात 100 ग्रॅम गुळ खाऊ शकत नाही आणि एवढा गूळ एका दिवसात खाणेही योग्य नाही.! आपण एका दिवसात साधारण 20 ग्रॅम गुळ खाऊ शकतो. यातून मिळणाऱ्या लोहाचा विचार केल्यास साधारण 2.2 mg लोह मिळते. म्हणजे दिवसातील लोहाच्या एकूण गरजेपैकी 12% गरज यामुळे भागवली जाते. अशाप्रकारे गुळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...