उन्हाळ्याच्या दिवसात काय प्यावे..?
उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाही लाही व्हायला सुरवात होते. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे वारंवार तहानही लागत असते. अशावेळी अनेकजण फ्रिजमधील थंडगार कोल्ड्रिंक्स पिऊन आपली तहान भागवतात. पण कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते त्यामुळे याठिकाणी खास उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी थंडपेयांची माहिती दिली आहे. ही थंडपेये आपल्याला उन्हाळ्यात गारवा आणि आरोग्यदायी फायदेही देतील.
उन्हाळ्यातील आरोग्यदायक थंडपेये व सरबते :
1) कोकम सरबत –
कोकम सरबत इतर कोणत्याही कृत्रिम कोल्ड्रिंक्सपेक्षा चविष्ट असून याचे आरोग्यासाठीचे फायदे अनेक आहेत. कोकम सरबत पित्त विकारावर अतिशय गुणकारी असतो. नियमित कोकम सरबत पिल्याने पित्ताचे खडे असणे, अंगावर पित्त उटणे, पित्तामुळे डोके दुखणे यासारखे अनेक पित्तविकार दूर होण्यास मदत होते.
कोकममुळे अंगात शीतलता वाढून जळजळ, दाह कमी होतो. लघवीस जळजळत असल्यास किंवा उन्हाळे लागण्याचा त्रास असल्यास कोकम सरबत त्यावर खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकम सरबत जरूर प्यावे. या सरबतासाठी लागणारे रातांबे कोकणाशिवाय मिळत नाहीत. पण काळजी करू नका कारण, आजकाल बाजारात रेडिमेड कोकम ज्युस मिळते त्यात फक्त पाणी घालायचे व कोकम सरबत करून प्यायचे.
2) शहाळ्याचे पाणी –
सोडिअम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असलेलं नारळ-पाणी उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरते. उन्हाळा सुरु झाला की अंगाची लाहीलाही होऊन त्यामुळे येणारा थकवा आपल्याला दमवून टाकतो. अशावेळी उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर नारळपाणी हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. याशिवाय उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यास यामुळे मदत होते.
3) उसाचा रस –
ऊस हा थंड गुणाचा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस पिणे उपयुक्त असते. ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो. त्यामुळे उसाचा रस पिण्यामुळे लघवी साफ होते. लघवीच्या वेळी आग होणे, जळजळणे, मुतखडा यासारख्या आजारात उपयुक्त ठरते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ न घातलेला उसाचा रस जरूर प्यावा.
4) लिंबू सरबत –
लिंबू सरबत किंवा लिंबूपाण्यामुळे युरिन साफ होते त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. याशिवाय लिंबू रसातून आपल्या शरीराला ‘क’ जीवनसत्व मिळते. लिंबू रसातून आपल्या शरीराला ‘क’ जीवन सत्व मिळते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच यात अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबूपाणी किंवा लिंबू सरबत पिणे कधीही चांगले असते.
5) आवळा सरबत –
उन्हाळ्यात आवर्जून पिण्यासारखे आणखी एक आरोग्यदायी पेय आहे ते म्हणजे आवळा सरबत. आवळ्यामध्येसुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-C असते. ताजी आवळे उपलब्ध नसल्यास बाजारातून आपण आवळा ज्यूस आणि त्यात पाणी घालून कधीही सरबत करून पिऊ शकता.
6) ताक –
उन्हाळ्यात ताक अमृतासमान गुणांचे असते. काळे मीठ, जिरे व हिंग घालून ताक पिल्यास आहाराचे पचन व्यवस्थित होते. ताकातून बराच थंडावा शरीरास मिळतो. उष्णतेमुळे शरीरावर होणारे परिणाम आपण टाळू शकतो. ताकामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, विटामिन बी व पोटेशिअम ही उपयुक्त पोषकतत्वे असतात.
यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. भूक न लागणे, अपचन, एसिडिटी, पोट साफ न होणे, पित्ताच्या तक्रारी, गॅसेस कमी होतात. त्यामुळे उन्हाळ्यात ताक हे अतिशय महत्त्वाचे पेय आहे. ताकापासून बनवलेले लस्सी, मठ्ठा ह्यासारखी पेयेसुद्धा आपण उन्हाळ्याच्या दिवसात पिऊ शकता.
हे सुद्धा वाचा –उन्हाळ्यात आहार कसा असावा ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Homemade cool drinks for summer season. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.