घशात कोरड पडणे – Dry throat :
बऱ्याचदा घशाला कोरड पडत असते. याची अनेक कारणे असू शकतात. घशाला कोरड पडल्याने घसा सुकतो.
घशाला कोरड पडण्याची कारणे –
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डिहायड्रेशन झाल्यामुळे घशाला कोरड पडू शकते. कारण डिहायड्रेशनमुळे घशात पुरेशी लाळ निर्माण होत नाही. त्यामुळे घशाला कोरड पडते.
- उन्हाळ्याच्या दिवसात उकड्यामुळे घशाला कोरड पडत असते.
- तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास त्यामुळेही घशाला कोरड पडते. कारण तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे घशातील लाळ व अद्रता सुकते.
- सर्दीमुळे नाक गच्च झालेले असल्यास तोंडाने श्वास घ्यावा लागतो. अशावेळीही घशात कोरड पडत असते.
- तापासारख्या आजारात सुद्धा घशाला कोरड पडते.
- सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांमुळे सुद्धा घशाला कोरड पडते.
- काही औषधांच्या दुष्परिणामामुळे घशाला कोरड पडू शकते.
घशाला कोरड पडणे यावर घरगुती उपाय :
दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिण्यामुळे घशाला कोरड पडत नाही. याशिवाय शहाळ्याचे पाणी, रसदार फळे, लिंबूपाणी, सरबत असे द्रवपदार्थ देखील प्यावेत.
तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे घशातील लाळ व अद्रता सुकते. त्यामुळे घशाला कोरड पडत असतो. यासाठी तोंड बंद करूनच झोपावे.
घशाला कोरड पडत असल्यास कोमट पाण्यात चमचाभर मध मिसळून ते पाणी प्यावे.
घशाला कोरड पडल्यास तीन ते चार काळ्या मिरी चावून खाव्यात. यामुळे तोंड व घशामधील लाळग्रंथी क्रियाशील होण्यास मदत होते. या उपायाने घशामध्ये पुरेशी लाळ निर्माण होते त्यामुळे घशाला कोरड पडत नाही.
घशाला कोरड पडल्यास वेलदोडे व खडीसाखर एकत्रित करून चघळत राहावी. यामुळे घशातील लाळग्रंथी क्रियाशील होतात.
घशाला कोरड पडू नये यासाठी घ्यायची काळजी :
- पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्यावे.
- तोंड बंद करूनच झोपावे.
- तोंडाने श्वास घेणे टाळावे.
- दररोज दात घासताना तोंडाची स्वछताही करावी.
- कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
- स्मोकिंग, तंबाखू, अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे.
हे सुध्दा वाचा – घशात दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Dry throat Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.