डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे (Eyes dark circles) :
डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा प्रश्न अनेकांना भेडसावतो. आपली धावपळीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धत, अपुरी झोप, मानसिक तणाव, उन्हात अधिक काळ फिरणे, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर, चहा-कॉफीचं अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो.
मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली जरी हा त्याच्यावरचा योग्य उपाय नव्हे, डोळ्याखालची ही काळी वर्तुळे घालवण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खुपच संयम ठेवावा लागतो. कारण रात्री उपचार केले आणि सकाळी परिणाम दिसले असं होत नाही. उपचारामध्ये दीर्घकाळ सातत्य असले तरच डोळ्याभोवतीची ही काळी वर्तळ निघुन जातात.
हे उपयुक्त उपाय करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, घरच्याघरी हे उपाय करता येतात. ज्यायोगे ही डोळ्याखालील वर्तुळे तुम्ही अगदी सहज घालवू शकता. अगदी साध्या, सोप्या उपायांनी तुम्हाला ही समस्या दूर करता येते.
डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
बटाटा –
बटाटा किसून त्याचा रस काळ्या वर्तुळाभोवती लावावा. याशिवाय बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर ठेव्याव्यात आणि दहा मिनिटांनी डोळे व चेहरा गार पाण्याने धुवावा. याशिवाय काकडीचे कापही डोळ्यांवर ठेवू शकता. त्याचाही या समस्येत फायदा होतो.
थंडगार लेप –
एक चमचा टोमॅटो रस, लिंबाच्या रसाचे काही थेंब, चिमूटभर हळद आणि थोडंसं गव्हाचे पीठ यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट काळ्या वर्तुळांवर लावा व पंधरा मिनिटांनी धुवून टाका. डोळ्याखालील काळे वर्तुळ घालवण्यासाठी हा लेप उपयुक्त ठरतो.
टोमॅटो आय टोनर –
लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा आणि या मिश्रणानं डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर मसाज करावा. वीस मिनिटानंतर पाण्याने डोळे व चेहरा धुवावा. यामुळेही डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे निघण्यासाठी मदत होते.
मसाज –
खोबऱ्याचे आणि बदामाच तेल एकत्र करून त्यानं काळ्या वर्तुळांवर हलक्या हाताने मसाज करावा. एक तास हे तेल चेहऱ्यावर राहू द्यावं. तासाभरानं कोमट पाण्यानं चेहरा व डोळे धुवावेत.
हर्बल टी-बॅग –
हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज किंवा वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवावा. त्यानंतर त्या थंड टी बॅग्ज किंवा हर्बल चहा पावडर कापडात बांधून डोळ्यांवर ठेवावी. याचाही खूप चांगला परिणाम होतो आणि काळी वर्तुळ निघून जाण्यासाठी मदत होते.
या घरगुती उपायांबरोबरचं काही काळजीही घेणे आवश्यक असते. जसे, दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, बाहेर उन्हात फिरताना गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा. अशी काळजी घेतल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळे लवकर निघून जाण्यासाठी मदत होते.
हे सुद्धा वाचा..
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Eyes dark circles causes and home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.