कॉलरा किंवा पटकी रोग – Cholera :

कॉलरा हा एक गंभीर असा जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे पसरत असतो. दूषित पाण्यामुळे कॉलराची साथ येत असते. या आजाराला पटकी रोग असेही म्हणतात.

कॉलरामध्ये रुग्णाला तीव्र जुलाब, अतिसार व उलट्या झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे या आजारावर त्वरित उपचार करणे आवश्यक असते. वेळीच उपचार न केल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

कॉलरा आजाराची कारणे – Cholera causes :

व्हिब्रियो कॉलेरी नावाच्या जीवाणूमुळे कॉलरा रोग होतो. व्हिब्रियो कॉलेरी हे बॅक्टेरिया दूषित पाणी, दुषित अन्नातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. ते बॅक्टेरिया लहान आतड्यांच्याठिकाणी जाऊन CTX नावाचे विषारी घटक निर्माण करतात. त्यामुळे रुग्णास पातळ पाण्यासारखे तीव्र जुलाब व अतिसार होऊ लागतात.

दूषित पाण्यातून कॉलराचा संसर्ग प्रामुख्याने होत असतो. कॉलरा बाधित रुग्णाची विष्ठा जलस्त्रोत किंवा पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे ह्या आजाराचा फैलाव होत असतो. याशिवाय दूषित अन्न, दूषित फळे व भाज्या यातूनही कॉलराचे बॅक्टेरिया पसरू शकतात. मात्र इतर साथीच्या रोगाप्रमाणे हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संपर्काद्वारे पसरत नाही.

कॉलराची लक्षणे – Cholera symptoms :

• पोटात मुरडा मारून वेदना होणे,
• ‎वारंवार पातळ शौचास होणे,
• ‎मळमळ व उलट्या होणे अशी लक्षणे कॉलरात असतात.

तसेच जर शरीरातील पाणी उलट्या व जुलाबमुळे कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा जाणवणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, तोंड, डोळे व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होणे, नाडीची गती वाढते अशी धोकादायक लक्षणे जाणवितात. अशावेळी त्वरित योग्य उपचार न झाल्यास रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते.

कॉलरा आजारावरील उपचार – Cholera treatment :

कॉलरात जुलाब झाल्याने तसेच उलट्यांमधून शरीरातील पाण्याची होणारी झीज भरून काढणे गरजेचे असते. दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. शरीरातील कमी झालेली पाणी व क्षार घटकांची पूर्तता करण्यासाठी रीहायड्रेशन सलाईन, झिंक सप्लिमेंट दिले जाते. तसेच यावर जिवाणू कमी करण्यासाठी अँटीबायोटिक्स औषधे दिली जातात.

पातळ शौचास व उलट्या होत असल्यास शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून रुग्णाला वरचेवर पाणी तसेच नारळाचे पाणी, भाताची पेज किंवा इतर द्रवपदार्थ भरपूर द्यावेत. जलसंजीवनी (ओआरएस) द्यावी. ओआरएस पावडर नसल्यास साखर, मीठ व पाण्यापासून घरीच जलसंजीवनी करून रुग्णास देता येते.

घरीच जलसंजीवनी करण्यासाठी स्वच्छ 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ चांगले एकजीव करावे. ही जलसंजीवनी रुग्णास वरचेवर थोडी थोडी देत राहावी. त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण संतुलित राहते व रुग्ण बरा होतो. एकदा केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी वापरू नये. दुसऱ्या दिवशी याचे पुन्हा नवीन मिश्रण करावे व ते वापरावे.

कॉलरा पेशंटसाठी असा द्यावा आहार :

रुग्णाला खाण्याकरिता साधे जेवण द्यावे. उकळवून गार केलेले पाणी द्यावे. मसालेदार, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ असलेले खाणे टाळावे. अर्धवट शिजलेले, शिळे अन्न, बाहेरील पदार्थ खाऊ नये.

पटकी रोग प्रतिबंधात्मक उपाय – Cholera prevention tips :

कॉलराची लागण होऊ नये यासाठी काय करावे, पटकीपासून बचाव कसा करावा, कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
• परिसरात कॉलराची साथ आली असल्यास अधिक काळजी घ्यावी.
• फिल्टरचे पाणी किंवा उकळवून गार केलेले स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे.
• जेवणापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• शौचविधीनंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• ‎अर्धवट शिजलेले, कच्चे, शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत.
• बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
• ‎भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत.
• ‎घराची व आजूबाजूची स्वच्छता राखावी.

दूषित पाण्यातून पसरणारे खालील साथीच्या रोगांचीही माहिती जाणून घ्या..
टायफॉईड ताप
जुलाब व अतिसार
गॅस्ट्रो आजार
कावीळ


Cholera causes, symptoms & treatments in Marathi information.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)