गॅस्ट्रो आजार – Gastroenteritis :

गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होत असतात. विशेषतः पावसाळ्यात गॅस्ट्रोची साथ येण्याचे प्रमाण अधिक असते. गॅस्ट्रोएन्ट्रायटिसचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी जुलाब व उलट्यातून कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोका संभवतो.

गॅस्ट्रोची कारणे – Gastro causes :

• सॅल्मोनेला, शिंगेला, स्टॅफीलोकोकस यासारखे बॅक्टेरिया आणि रोटा, अॅडेनो व्हायरस यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोची लागण होत असते.
• ‎दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.
• ‎दूषित आहार, उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने, पाणी न गाळता, न उकळता दूषित पाणी पिल्याने तसेच स्वच्छतेच्या अभाव, अस्वच्छ परिसर ही गॅस्ट्रो होण्यामागील सर्वसाधारण कारणे आहेत.

गॅस्ट्रोची लक्षणे – Gastro symptoms :

• पोट दुखणे,
• जुलाब व उलट्या होणे,
• वारंवार पातळ संडास होणे,
• ‎जुलाब व उलट्या झाल्यामुळे डीहायड्रेशन होणे (शरीरातील पाणी कमी होणे),
• ‎भूक न लागणे, ताप, डोकेदुखी, ओटीपोटात दुखणे, पोटात मुरडा पडणे, चक्कर येणे तसेच अशक्तपणा वाटू लागणे अशी लक्षणे यात असतात.

तसेच जर शौचामधून रक्त जात असल्यास अमिबा, सॅल्मोनीला, शिंगेला तसेच इकोलाय या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याची शक्यता असते.

गॅस्ट्रोमुळे लहान मुले अधिक प्रभावित होतात. लहान मुलांची टाळू खोल जाने, डोळे खोल जाणे, उलट्या आणि जुलाब होऊन डीहायड्रेशन होते. लहान मुलांचे तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे यासारखी लक्षणे गॅस्ट्रोमुळे लहान मुलांमध्ये दिसून येतात.

गॅस्ट्रो प्रतिबंधात्मक उपाय – Gastro prevention tips :

गॅस्ट्रोची लागण होऊ नये म्हणून काय करावे, कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
• पाणी उकळून व गाळून पिणे.
• ‎जेवण योग्य पद्धतीने शिजवून योग्य पद्धतीने साठवून ठेवले पाहिजे.
• ‎एखादा पदार्थ खराब झाल्याची शंका असल्यास ते खाऊ नये.
• ‎जेवण्याआधी तसेच बाथरुमला जाऊन आल्यानंतर दोन्ही हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• ‎घरातील व आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता राखावी.

गॅस्ट्रोवर असे करतात उपचार – Gastro treatment :

जुलाब तसेच उलट्यांमधून शरीरातील पाण्याची होणारी झीज भरून काढणे गरजेचे ठरते. त्यामुळे असा त्रास होत असल्यास दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत घरगुती उपाय करीत बसू नये.
• डिहायड्रेशन कमी प्रमाणात असले तर पाणी तसेच इतर द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. जलसंजीवनी (इलेक्ट्रोलाइट इ.) द्यावी.
• ‎जुलाब होत असल्याने अनेकजण खाणे टाळतात. पण पोट रिकामे ठेवणे अजिबात योग्य नाही.
• ‎नवजात मुलांना गॅस्ट्रो असल्यासही स्तनपान सुरू ठेवावे. तसेच मुलांना डॉक्टरांकडे तात्काळ घेऊन जावे.
• ‎जीवाणू संसर्गामुळे जुलाब आणि अतिसार होत असल्यास अॅण्टिबायोटिक्स औषधे दिली जातात.

हे सुद्धा वाचा..
टायफॉईड आजार
कॉलरा आजार
अतिसार, जुलाब होणे
कावीळ

Gastroenteritis symptoms, causes, prevention & treatments information in Marathi language.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)