चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे (Wrinkles) :
चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे वाढत्या वयाचे एक लक्षण मानले जाते. प्रामुख्याने 35 ते 40 वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. वाढत्या वयामुळे त्वचेतील लवचिकपणा कमी झाल्याने (skin flexibility) ही समस्या होत असते. तसेच सूर्याच्या Ultraviolet किरणांच्या परिणामामुळे, सिगारेट सारख्या स्मोकिंगच्या व्यसनांमुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी अनेकजण बाजारातील महाग असणाऱ्या एन्टी एजींग क्रीमचा वापर करतात. यासाठी याठिकाणी चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी काही घरगुती आयुर्वेदिक उपायांची माहिती दिली आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे हे आहेत घरगुती उपाय :
खोबरेल तेल –
चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असल्यास खोबरेल तेल उपयोगी पडते. खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून खोबरेल तेल हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉश्चराइजर प्रमाणे काम करते. यामुळे त्वचा मुलायम बनते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा.
ऑलिव्ह ऑइल –
खोबरेल तेलाप्रमाणेच आपण ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता. यामध्येही अँटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन-A आणि व्हिटॅमिन-E मुबलक असते. त्यामुळे दररोज एक चमचा ऑलिव्ह तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्याने सुरकुत्या पडत नाहीत.
मध –
चमचाभर मधात लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळेही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल.
अंड्याचा पांढरा भाग –
अंड्याचा पांढऱ्या भाग वाटीत घेऊन त्यामध्ये चमचाभर लिंबू रस आणि अर्धा चमचा मध घालून मिश्रण तयार करावे व ते चेहऱ्यावर लावावे. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने त्वचेच्या पेशींचे आरोग्य सुधारून चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
बनाना मास्क –
एक पिकलेले केळे घेऊन ते चांगले कुस्करून घ्यावे. त्यानंतर त्यात एक चमचा संत्र्याचा रस आणि एक चमचा दही घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. बनाना मास्कमुळे त्वचा खेचली जाऊन चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी मदत होते.
कोरपडीचा गर –
कोरफडीचा गर (अॅलोव्हेरा जेल) चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा, स्वच्छ आणि हायड्रेट होत असते. अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. कोरपडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी कोरपडीचा गर उपयुक्त असतो.
चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Wrinkles home remedies. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.