बाळगुटी (Ayurvedic balguti) :
आयुर्वेदात बाळाच्या आरोग्यासाठी बाळगुटी किंवा बाळकडू यांचे महत्त्व सांगितलेले आहे. बालगुटीमध्ये अनेक आयुर्वेदिक औषधांचा समावेश असतो. ही औषधे उगाळून बाळाला चाटण केले जाते. विशेषतः बालगुटी ही आईच्या दुधात उगाळून दिली जाते.
बाळगुटीतील साहित्य –
मुरुडशेंग, वेखंड, बाल हिरडा, खारीक, हळकुंड, बदाम, सुंठ, जायफळ, काकडशिंगी, डिकेमली, अश्वगंधा, जेष्ठमध, लेंड पिंपळी इत्यादी साहित्य बाळगुटीमध्ये असते.
गुटी उगळण्यासाठी साहित्य –
आईचे दूध दोन ते तीन चमचे व सहान (चंदन उगळण्यासाठी वापरतात ती फरशी)
बाळाला गुटी अशी द्यावी :
पहिल्यांदा सहान स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यावर थोडे आईचे दूध टाकावे आणि गुटीतील एक एक साहित्य घेऊन ते सहाणेवर आईच्या दुधात 1 ते 2 वेळा घासावे. सर्व साहित्य घासून झाल्यावर जाडसर पेस्ट तयार होते. ती वाटीत जमा करावी व त्यात थोडे आईचे दूध मिसळून त्याचे चाटण बाळास करावे.
बाळाचे विविध आजार व बाळगुटी :
बाळाची छाती भरणे –
खोकला व सर्दीमुळे बाळाची छाती भरल्यास सहाणेवर गुटीच्या साहित्यातील वेखंड उगाळून त्याचे थोडे चाटण बाळास करावे. यामुळे छातीतील कफ निघून झाण्यास मदत होईल.
ताप येणे –
बाळास ताप आल्यास सहाणेवर गुटीच्या वेखंड उगाळून त्याचा लेप बाळाच्या कपाळावर करावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होईल.
पोट साफ न होणे –
बाळाचे पोट सोफ होत नसल्यास किंवा बाळाला शी होताना खडा होत असल्यास बाळहिरडा उगाळावा व त्याचे चाटण बाळास करावे.
पोट दुखणे –
बाळाचे पोट दुखण्यामुळे बाळ रडत असल्यास मुरुडशेंग उगाळावी व त्याचे चाटण बाळास करावे.
बाळाला पातळ शी होणे –
बाळाला पातळ शी होत असल्यास जायफळ उगाळून त्याचे थोडे चाटण बाळास करावे.
बाळाला गुटी द्यावी की नाही याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर बाळगुटी देण्याची शिफारस करू शकतात तर अनेक बालरोगतज्ज्ञ हे बाळास बाळगुटी देऊ नये असे सांगतात. त्यामुळे आपल्या बाळास बाळगुटी देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
Read Marathi language article about Ayurvedic balguti. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.