लहान बाळाचे पोट साफ होण्यासाठी हे करा उपाय – Baby constipation in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बाळामधील बद्धकोष्ठता :

अनेक दिवस बाळास शी होत नसल्यास त्या समस्येला बाळामधील बद्धकोष्ठता असे म्हणतात. यामुळे बाळास शी करताना जास्त त्रास होणे, मलाचा खडा धरणे, बाळाचे पोट साफ न होणे, बाळाची चिडचिड होणे, बाळाची भूक कमी होणे असे त्रास होऊ शकतात.

बाळामध्ये बद्धकोष्ठता होण्याची कारणे :

• पुरेसे आईचे दूध न मिळणाऱ्या नवजात बालकामध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते.
• पावडरचे फॉर्म्युला दूध पिणारी बालके,
• ठोस आहार देताना तरल पदार्थ कमी दिल्याने,
• तसेच पचनसंस्थेतील बिघडामुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते.

बाळ कितीवेळा शी करते..?

बाळ कोणता आहार घेते, स्तनपान करते की फॉर्म्युला दूध पिते, बाळाचे वय किती आहे अशा अनेक गोष्टीवर लहान बाळ दररोज कितीवेळा संडास करू शकते ते ठरत असते.

• पहिल्या आठवड्यात – दररोज 4 ते 5 वेळा बाळ शी करू शकते.
• पुढील आठ ते 28 दिवसापर्यंत – दररोज 2 ते 3 वेळा बाळ शी करू शकते.
• एक महिना ते 12 महिन्यांमध्ये – दररोज 1 ते 2 वेळा बाळ शी करू शकते.
• एक वर्षांपासून पुढे – दररोज 1 वेळा बाळ शी करू शकते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

नवजात बाळाला शी होत नसल्यास हे करा उपाय :

पुरेसे स्तनपान न मिळाल्याने सहा महिन्यापेक्षा कमी वयातील नवजात बाळांना बद्धकोष्ठता होत असते. अशावेळी बाळास अधिक प्रमाणात आईचे दूध दिले पाहिजे. जर बाळास फॉर्म्युला दूध देत असल्यास थोड्या अधिक मात्रेत फॉर्म्युला दूध देण्याची आवश्यकता असते. सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या नवजात बाळांमध्ये बद्धकोष्ठता झाल्यास कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. बाळास बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक होत असल्यास डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.

सहा महिन्यानंतरच्या लहान बाळाचे पोट साफ होण्यासाठी हे करा उपाय :

बाळाला सहा महिने झाल्यानंतर हळूहळू स्तनपान कमी करून ठोस आहार दिला जातो. अशावेळी पुरेसे तरल पदार्थ देणेही आवश्यक असते. यासाठी एक वर्ष होईपर्यंत थोडेथोडे बाळास स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध देत राहावे. बाळास वरचे दूध व पुरेसे पाणीही द्यावे. त्याच्या आहारात फळे, भाज्या यांचा समावेश असावा. कारण यात फायबर्सचे प्रमाण मुबलक असून पोट साफ होण्यास मदत होते.

हे करा घरगुती उपाय :

• बाळास तूप घातलेला भात बाळास भरवावा. यामुळे बाळाचे पोट साफ होण्यास मदत होते.
• एक छोटा टोमॅटो एक कप पाण्यात घालून ते पाणी उकळावे. हे पाणी गाळून घेऊन थंड झाल्यावर बाळास दररोज तीन ते चार चमचे बाळास पाजावे. यामुळेही बाळाचे पोट साफ होण्यास मदत होते.
• बाळाबरोबर थोडे खेळावे. यामुळे त्याचा व्यायाम होऊन अन्न व्यवस्थित पचण्यास व नियमित पोट साफ होण्यास मदत होते.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.