अक्कल दाढ दुखणे – Wisdom Teeth :
अक्कल दाढ येताना त्या दाढेच्या ठिकाणी वेदना होत असतात. बहुतांश 17 ते 25 वयाच्या व्यक्तींमध्ये अक्कल दाढ येत असते. ही सर्वात शेवटची दाढ असून याला विस्डम टुथ (Wisdom Teeth) असेही म्हणतात.
अक्कल दाढ दुखण्याची कारणे –
अक्कल दाढ येताना हिरड्यांवर दबाव येत असतो तसेच या दाढेसाठी पुरेशी जागा नसल्यास त्यामुळेही दाढेच्याठिकाणी भयंकर वेदना होणे, हिरडी सुजणे, डोके दुखणे हे त्रास होत असतात.
याशिवाय अक्कल दाढ किडल्यामुळेही त्याठिकाणी दुखू लागते, अन्न चावताना हिरड्या दुखणे हे त्रासही यामुळे होत असतात. यासाठी अक्कल दाढ दुखीवरील उपयुक्त उपाय यांची माहिती खाली दिली आहे.
अक्कल दाढ दुखीवर घरगुती उपाय –
लवंग –
दाढदुखी होत असल्यास लवंग खूप उपयोगी ठरते. यातील anesthetic आणि analgesic गुणामुळे वेदना दूर होते. दुखणाऱ्या दाढेजवळ लवंग धरून ठेवल्याने अक्कल दाढदुखी दूर होते. लवंगमधील अँटीबॅक्टेरिअल या औषधी गुणांमुळे दात आणि दाढेतील इन्फेक्शनही कमी होते. याशिवाय लवंग पावडर किंवा लवंग तेलही आपण दुखणाऱ्या अक्कल दाढेच्या मुळाशी लावू शकता. अक्कल दाढ दुखीवर हा उपाय खूप उपयुक्त आहे.
पेरूची पाने –
पेरूच्या पानात anti-inflammatory आणि antimicrobial हे गुण असल्याने अक्कल दाढ येताना हिरड्यांना आलेली सूज व इन्फेक्शन कमी होऊन वेदना दूर होते. यासाठी पेरूची तीन ते चार कोवळी पाने थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी आणि दुखणाऱ्या दाढेच्या मुळाशी त्यातील थोडीशी पेस्ट लावावी. किंवा पेरूची पाने स्वच्छ धुवून तोंडात चघळत राहावे.
हिंग –
हिंग हे दातदुखीवर सर्वात उपयुक्त असते त्यामुळे दाढदुखीवरही ते गुणकारी ठरते. चिमुटभर हिंग दुखणाऱ्या अक्कल दाढेजवळ लावल्याने दाढ दुखणे कमी होण्यास मदत होईल.
अक्कल दाढ कधी काढावी लागते..?
- अक्कल दाढ किडल्यामुळे भरपूर दुखत असल्यास,
- अन्न चावताना अक्कल दाढ दुखत असल्यास,
- अक्कल दाढेच्या हिरड्यांना वारंवार सूज येत असल्यास,
- अक्कल दाढ वाकडी असेल व बाजूच्या दाढेला त्रास देत असेल किंवा दाढ किडून तिचा संसर्ग बाजूच्या दाढेला होऊन ती किडत असेल तर दाढ काढून टाकावी लागते.
अक्कल दाढ अशी काढतात (Wisdom Teeth Removal) :
अक्कल दाढेचा त्रास होत असल्यास दाताचे डॉक्टर (डेंटिस्ट) हे दातांची तपासणी करून दाढ काढत असतात. जर अक्कलदाढ सरळ असल्यास आणि तोंडात ती दाढ सहज दिसत असल्यास अक्कलदाढ सहजपणे काढता येते.
जर ती अक्कल दाढ तोंडात सहज दिसत नसल्यास आपले डॉक्टर एक छोटेसे ऑपरेशन करून ती दाढ काढून टाकतात. हे ऑपरेशन घाबरण्यासारखे नसून ते केवळ पंधरा मिनिटे ते एक तासात पूर्ण होते. ऑपरेशन करण्यापूर्वी अक्कल दाढेच्या भागापूरते भुलीचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे ऑपरेशनमध्ये फारसा त्रास जाणवत नाही.
मात्र भूल उतरल्यावर दोन-तीन दिवस त्रास होऊ शकतो. यामध्ये ऑपरेशन केलेल्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, रक्तस्राव होणे असे त्रास होऊ शकतात. दाढ काढल्यावर त्या ठिकाणी टाके घालतात व ते टाके सात दिवसांनंतर काढून टाकतात.
हे सुद्धा वाचा..
दातदुखीवरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Wisdom teeth pain treatment. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.