प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीच्या पोटात दुखणे ही सामान्य बाब आहे. अनेक गर्भवती महिलांना प्रेग्नन्सीमध्ये कधीनाकधी पोटात वेदना होत असते. गर्भावस्थेत अनेक कारणांमुळे पोटदुखी होत असते. यातील काही कारणे ही सामान्य तर काही कारणे ही धोकादायक सुद्धा असू शकतात.
गरोदरपणात पोट का व कशामुळे दुखते..?
गरोदर स्त्रियांमध्ये काहीवेळा पोटदुखी ही अपचन, गॅसेस किंवा बद्धकोष्ठतेमुळे देखील होऊ शकते. तर कधीकधी गरोदरपणात होणारी पोटदुखी ही गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. कारण एक्टॉपिक प्रेगन्सी किंवा गर्भपात (मिसकॅरेज) अशा काही गंभीर कारणांमुळेही प्रेग्नन्सीमध्ये पोटदुखी होऊ शकते.
प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या तिमाहीत होणाऱ्या पोटदुखीची कारणे :
गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात पोटात दुखणे ही सामान्य आहे. प्रामुख्याने गर्भधारणा होताना गर्भाशयाची होणारी वाढ, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी अशा कारणांमुळे पहिल्या तीन महिन्यात पोटदुखी होत असते.
गर्भावस्थेत दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत होणाऱ्या पोटदुखीची कारणे :
गर्भावस्थेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत पोटदुखी जाणवल्यास जास्त काळजी घेण्याची गरज असते. या काळात होणारी पोटदुखी ही बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस, ऍसिडिटी याबरोबरच Preeclampsia यामुळे पोटात दुखू शकते. तर गरोदरपणाच्या शेवटच्या काही दिवसात Braxton Hicks आणि प्रसुतीच्या कळा यांमुळेही पोटात दुखत असते.
गरोदरपणात पोटात दुखणे यावरील उपाय :
पोटात दुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. याशिवाय पोटदुखीमध्ये गरम पाण्याच्या पिशवीने पोटावर थोडा शेक घ्यावा किंवा गरम पाण्याने अंघोळ करावी.
गरोदरपणात पोट दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही घरगुती उपाय करू नये. पोटदुखीचे कारण सामान्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित असे वेदनाशामक औषध घेऊ शकता.
गरोदर स्त्रीच्या पोटात दुखत असल्यास डॉक्टरांकडे केंव्हा जावे..?
अधिक काळापर्यंत पोटात दुखत असल्यास, किंवा पोटदुखीमध्ये मासिक पाळीप्रमाणे वेदना होत असल्यास, योनीतुन रक्तस्राव (ब्लीडिंग) होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
Read Marathi language article about Abdominal pain during pregnancy. Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.