गरोदरपणातील रक्तस्राव (Pregnancy Bleeding) :
प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना योनीतुन रक्तस्राव होत असतो. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात याचे प्रमाण अधिक असते. योनीतून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते धोकादायक लक्षण असू शकते. अशावेळेस आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घेणे गरजेचे असते.
प्रेग्नन्सीतील स्पॉटिंग व ब्लिडिंग म्हणजे काय..?
योनीतून जेंव्हा हलका रक्तस्त्राव झाल्याने रक्ताचे डाग पडत असतात अशावेळी त्याला ‘स्पॉटिंग’ असे म्हणतात. मासिक पाळीच्या अगदी सुरूवातीस किंवा शेवटी येणार्या रक्ताच्या डागांसारखेच यांचे स्वरूप असते. मात्र यात रक्ताचे प्रमाण खूप कमी असते. गर्भावस्थेत काहीवेळा लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग (spotting) पडू शकतात.
त्याचप्रमाणे जर योनीतुन अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास त्या स्थितीला ब्लिडिंग (bleeding) असे म्हणतात. ब्लिडिंग होत असल्यास सॅनिटरी पॅड वापरण्याची आवश्यकता असते.
प्रेग्नन्सीमध्ये स्पॉटिंग कशामुळे होऊ शकते..?
प्लेसेंटा विकसित होत असताना 5 ते आठ आठवड्यादरम्यान स्पॉटिंग होऊ शकते. यावेळी येणारा रक्तस्राव 3 दिवसापेक्षा अधिक दिवस येत नाही.
याशिवाय हार्मोन्समधील बदलांमुळे, यूटेरीन फाइब्राइड, सर्वाइकल पॉलिप किंवा योनीमार्गातील इन्फेक्शनमुळे स्पॉटिंग होऊ शकते.
प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग का व कशामुळे होते..?
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होणारा अधिक प्रमाणातील रक्तस्त्राव हा गर्भपात किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी, मोलर गर्भावस्था यामुळे होऊ शकतो. गर्भपात किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे रक्तस्राव झाला असल्यास पोटात अतिशय वेदनाही होत असतात. याशिवाय गरोदरपणात पोटावर आघात झाल्यास किंवा हाय-ब्लडप्रेशर यांमुळेही योनीमार्गातून रक्तस्राव होऊ शकतो.
गरोदरपणातील तिमाहीनुसार रक्तस्राव होण्याची कारणे :
गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यांत रक्तस्राव (ब्लीडिंग) होण्याची कारणे –
• सुरवातीला प्लेसेंटा विकसित होत असताना 5 ते आठ आठवड्यादरम्यान स्पॉटिंग होऊ शकते. यावेळी येणारा हलका रक्तस्राव हा 3 दिवसापेक्षा अधिक दिवस येत नाही.
• हार्मोन्स मधील बदलांमुळे, यूटेरीन फाइब्राइड, सर्वाइकल पॉलिप किंवा योनीमार्गातील इन्फेक्शनमुळे हलका रक्तस्राव (स्पॉटिंग) होऊ शकते.
• गर्भपात झाल्यास किंवा मोलर प्रेग्नन्सी असल्यास जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. अशावेळी पोटात अतिशय वेदनाही होत असतात.
• एक्टोपिक प्रेग्नन्सीची स्थिती असल्यास हलका किंवा जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. यामध्येही ओटीपोटात वेदना होत असतात.
प्रेग्नन्सीमध्ये दुसऱ्या तिमाहीत रक्तस्राव होण्याची कारणे –
• गर्भपात झाल्यास जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. अशावेळी पोटात अतिशय वेदनाही होत असतात.
• प्लासेण्टा संबंधित कारणांमुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.
• सर्विक्समधील समस्यामुलेही हलका रक्तस्राव होऊ शकतो.
गर्भावस्थेच्या शेवटच्या तिमाहीत रक्तस्राव होण्याची कारणे –
शेवटच्या तिमाहीत म्हणजे प्रेग्नन्सीच्या 7, 8 आणि 9व्या महिन्यात होणारा रक्तस्राव हा वार (प्लासेण्टा) संबंधित असतो. वार ही प्रामुख्याने गर्भाशयाच्या वरील भागात असते. मात्र जर वार ही गर्भाशयाच्या खालील भागात असल्यास तिसऱ्या तिमाहीत ती सुटू शकते व त्यामुळे रक्तस्राव होतो. वार सुटून रक्तस्राव होणेसुद्धा धोकादायक बाब आहे. तसेच रक्तदाब वाढल्यामुळे किंवा मार लागल्यामुळेही वार सुटू शकते व रक्तस्राव होऊ शकतो.
याशिवाय अकाली प्रसुतीमध्येही रक्तस्राव होऊ शकतो.
सोनोग्राफी करून वार कोणत्या भागात आहे याचे निदान करता येते. यासाठी गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या नियमित करणे आवश्यक असते. येथे क्लिक करा व गरोदरपणात कोणत्या तपासण्या कधी कराव्यात याची माहिती जाणून घ्या..
गर्भावस्थेत योनीतून रक्तस्राव होत असल्यास काय करावे..?
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात योनीतून स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होणे ही सामान्य बाब आहे. कारण साधारपणे चारपैकी एका गर्भवती स्त्रीला पहिल्या तिमाहीत रक्तस्त्राव होऊ शकतो. मात्र काहीवेळा योनीतून होणारा रक्तस्राव हा गर्भपात किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी यासारख्या गंभीर स्थितीमुळेही होऊ शकते. त्यामुळे योनीतून स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा व दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.