आमवात (Rheumatoid arthritis) :
आमवात किंवा रूमेटाइड अर्थराइटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे. आमवात हा संधिवात असला तरीही याचा परिणाम केवळ सांधेच नव्हे तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात सांध्यांमध्ये सूज येते व सांधे दुखू लागतात. हाडांची झीज होते तसेच सांध्याचे आकारही वेडेवाकडे होतात. आमवातावर वेळीच उपाय होणे आवश्यक असते. यासाठी येथे आमवातावरील काही उपयुक्त घरगुती उपाय सांगितले आहेत.
आमवातावर हे करा घरगुती उपाय –
ऍपल व्हिनेगर –
ऍपल व्हिनेगर हे विविध खनिजे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असते. यामुळे सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी कोमट पाण्यात ऍपल व्हिनेगर व मध मिसळावे आणि हे मिश्रण दररोज सकाळी प्यावे. यामुळे आमवातात आलेली सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
आले –
आल्यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सांध्यातील वेदना व सूज कमी करण्यास मदत करतात. आमवातावर आले हा अतिशय प्रभावी घरगुती उपचार आहे. दररोज 2 ते 3 आल्याचे तुकडे खावेत. सांध्यांतील रक्ताभिसरण सुधारते व सांधेदुखी, सूज आणि जखडन कमी होते. याशिवाय आमवात असल्यास सुंठ मिसळलेले कोमट पाणी पिणेही फायदेशीर ठरते.
हळद –
हळदमध्ये कुरकुमिन नावाचा कार्यकारी घटक असतो ज्यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आमवात मध्ये सांध्यांना येणारी सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. आमवातावर हा घरगुती उपाय उपयुक्त ठरतो.
सैंधव मीठ –
सैंधव मिठात मॅग्नेशियमचे मुबलक प्रमाण असते. यामुळे शरीरातील पीएच पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. आमवात असल्यास आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
एरंडेल तेल –
एरंडेल तेलसुद्धा आमवातमध्ये खूप उपयुक्त असते. आमवात असल्यास गरम भाकरी एरंडेल तेलाबरोबर खावी किंवा चपाती करताना एरंडेल तेल मोहन म्हणून वापरावे. याशिवाय सूज आलेल्या व दुखणाऱ्या सांध्यांवर एरंडाची पाने बांधावीत.
आमवात हा आजार योग्य उपचार न केल्यास दिवसेंदिवस वाढत जातो. त्यामुळे सांधे वेडीवाकडी होतात, सांध्यांची हालचाल करणे कठीण होते, रुग्णाचे अगदी चालणे फिरणेही अवघड होते.
त्यामुळे आमवातवर वेळीच योग्य औषध उपचार होणे आवश्यक असते. आमवातविषयी माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Rheumatoid arthritis home remedies. Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.