PCOD म्हणजे काय..?
PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय डिसऑर्डर. पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी हार्मोनल संबधित समस्या आहे. याला PCOS अर्थात Polycystic ovary syndrome या नावानेही ओळखले जाते. चुकीचे खानपान, व्यायामाचा अभाव, हार्मोन्समधील असंतुलन अशा विविध कारणांमुळे अनेक महिला ह्या पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. 15 ते 44 अशा रिप्रॉडक्टीव्ह वयोगटातील कोणत्याही स्त्रियांमध्ये ही समस्या होऊ शकते.
पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने हार्मोन्समधील असंतुलनामुळे उद्भवते. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनची पातळी वाढत असते. एंड्रोजन हे पुरुष हार्मोन असून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक झाल्यास ही समस्या होत असते. यामुळे स्त्रीमध्ये अंडाशयावर गाठी तयार होऊ लागतात. तसेच यामुळे अंडाशयाच्या आकारात वाढ होऊन त्याभोवती फॉलिकल्स साठू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर याचा परिणाम होतो.
स्त्री असो वा पुरुष दोघांच्याही शरीरात निसर्गतः स्त्री आणि पुरुष असे दोन्ही हार्मोन्स असतात. मात्र पीसीओडी असलेल्या महिलेमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाण पुरुष हार्मोनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे अंडाशयात समस्या निर्माण होऊ लागतात आणि त्याच वेळी अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवू शकते.
PCOD ची लक्षणे (PCOD Symptoms) :
पीसीओडीची लक्षणे ही प्रत्येक स्त्री मध्ये वेगवेगळी असू शकतात. याची साधारण लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
- मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे – पीसीओडी मुळे पीरियड्स अनियमित असू शकतात किंवा अनेक महिने पीरियड्स येणं बंद होते. किंवा पीरियड्स दरम्यान खूप जास्त रक्तस्त्रावही होऊ शकतो. अशा पाळीच्या तक्रारी यामुळे होतात.
- स्त्रियांमध्ये नको त्या ठिकाणी केसांची वाढ होणे – स्त्रीमध्ये पुरुष हार्मोन अँड्रोजन जास्त तयार झाल्यामुळे शरीरावर बरेच बदल होऊ लागतात. यामुळे स्त्रियांच्या चेहरा, हनुवटी, स्तन, पोट अशा ठिकाणी अनावश्यक केस येतात.
- चेहऱ्यावर मुरुम अधिक येणे – हार्मोन्समधील बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम अधिक येऊ लागतात. तसेच तेलकट त्वचेची समस्याही यावेळी होऊ शकते.
- केस गळणे – स्त्री शरीरात एंड्रोजन हार्मोनचे प्रमाण अधिक वाढवल्यास डोक्याचे केस पातळ होऊ शकतात आणि त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.
- वजन वाढणे – पीसीओडीमुळे स्त्रियांचे वजन जास्त वाढू लागते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या होऊ लागते.
- झोपेच्या समस्या होणे – हार्मोनल बदलामुळे डोकेदुखी, थकवा असे त्रास होऊन झोपेच्या तक्रारी सुरू होतात.
- गर्भवती होण्यास अडचणी येणे – पीसीओडी हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे. पीसीओडी समस्येमुळे स्त्री गर्भवती होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
PCOS ची कारणे (PCOS Causes) :
- चुकीचे खानपान – वारंवार तेलकट पदार्थ, चरबीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड असा चुकीचा आहार खाण्यामुळे पीसीओडी ची समस्या होते.
- मानसिक ताणतणाव,
- व्यायामाचा अभाव,
- लठ्ठपणा,
- आनुवंशिकता – तुमच्या आई किंवा बहिणीला पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हालाही जीन्समुळे ही समस्या होऊ शकते.
अशा कारणांनी पीसीओडी ही समस्या होत असते.
PCOS मुळे होणारे परिणाम (Complications) :
- पीसीओडीचा विपरीत परिणाम स्त्रीच्या प्रजननक्षमतेवर होऊ शकतो. यामुळे वंध्यत्व म्हणजे मूलबाळ न होण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळेच PCOS हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण मानले जाते.
- तसेच यामुळे अकाली गर्भस्त्राव (miscarriage) होण्याचा धोकाही असतो.
- PCOS असलेल्या 80 टक्के महिलांचे वजन जास्त प्रमाणात वाढत असते. अशा स्त्रियांना लठ्ठपणामुळे रक्तातील साखर वाढणे, हाय ब्लडप्रेशर, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढणे अशा समस्या होतात. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात असे गंभीर मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचा धोका अधिक वाढतो.
- तसेच स्लीप अॅप्निया, एंडोमेट्रियल कर्करोग आणि नैराश्याचा धोका सुध्दा ह्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांना अधिक असतो.
असे पीसीओडीमुळे स्त्रीच्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात.
पीसीओडी चे निदान (Diagnosis) :
स्त्रीमध्ये असणारी लक्षणे, होणारे त्रास यावरून डॉक्टर PCOS चे निदान करू शकतात. निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणी केली जाते. तसेच काही हॉर्मोन्स टेस्ट करून याचे निदान केले जाते. यासाठी Follicle Stimulating Hormone, Luteinizing hormone, Testosterone अशा हॉर्मोन्स टेस्ट करण्यास डॉक्टर सांगतील.
तसेच PCOS चे निदान झाल्यास भविष्यात हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या समस्या होण्याची शक्यता आहे का ते पाहण्यासाठी कोलेस्टेरॉल, इन्सुलिन आणि ट्रायग्लिसराइड यांचे प्रमाण तपासण्यासाठी रक्ताच्या चाचण्या देखील केल्या जातात.
पीसीओडी उपचार (PCOD treatment) :
पीसीओडीवर कोणताही विशेष उपचार नाहीत. पीसीओडी वरील उपचारांचा उद्देश हा त्याची लक्षणे कमी करून पुढील गुंतागुंती टाळणे हा असतो.
गर्भनिरोधक गोळ्या आणि मधुमेहावरील मेटफॉर्मिन यासारख्या औषधांचा वापर उपचारामध्ये करू शकतात. यामुळे मासिक पाळीमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. तसेच क्लोमिफेन सारखी औषधे PCOS असलेल्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी दिली जातील. काहीवेळा व्हिडिओ लॅपरोस्कोपीच्या साहाय्याने पॉलिसिस्टिक ओव्हरीजवर शस्त्रक्रिया करतात.
पीसीओडी असणाऱ्या स्त्रियांनी घ्यायची काळजी –
हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब केल्यास पीसीओडी ची लक्षणे आटोक्यात ठेवता येतात. यासाठी पीसीओडी असणाऱ्या स्त्रियांनी खालील गोष्टी अमलात आणाव्यात.
- वजन आटोक्यात ठेवावे.
- दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करावा. व्यायामात चालणे, पळणे, सायकलिंग, झुंबा डान्स, पायऱ्या चढणे यासारखे व्यायाम करावेत.
- चरबी वाढवणारे पदार्थ, फास्टफूड, तळलेले, मैदायुक्त पदार्थ, साखर, मिठाई, स्नॅक्स आणि ब्रेड खाणे टाळावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, धान्ये, कडधान्ये, सुखामेवा, दूध, अंडी, मांस, मासे यांचा समावेश करावा.
- पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्या.
- नियमित आपल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घ्या.
- मानसिक तणावापासून दूर राहा. यासाठी एखादा छंद जोपासा. तसेच ध्यानधारणा करू शकता.
- धूम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
अशी काळजी PCOD असणाऱ्या स्त्रियांनी घ्यावी.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
PCOS चे वेळीच निदान होऊन त्यावर लवकर उपचार होण्यासाठी खालील लक्षणे दिसून येत असल्यास, स्त्रियांनी त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडे जावे.
- गरोदर नसूनही तुमची मासिक पाळी चुकली असल्यास डॉक्टरांकडे जावे.
- अनियमित मासिक पाळी असल्यास डॉक्टरांकडे जावे.
- PCOS ची लक्षणे दिसून आल्यास, जसे की तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केसांची वाढ होत असल्यास, चेहऱ्यावर मुरूम अधिक येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
- बरेच दिवस प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
- तुम्हाला मधुमेहाची लक्षणे असल्यास, म्हणजे जास्त तहान किंवा भूक लागणे यासारखी लक्षणे दिसून येत असतील तर डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
पीसीओडी असल्यास गर्भधारणा होऊ शकते का ..?
पीसीओडी या समस्येमुळे स्त्रीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. आज पीसीओडी ही समस्या स्त्रियांमध्ये मूलबाळ न होण्याचे प्रमुख कारण बनलेले आहे. मात्र पीसीओडीमध्ये आयव्हीएफच्या मदतीने गर्भधारणा करता येते. यासाठी आयव्हीएफ उपचारापूर्वी औषधांच्या मदतीने हार्मोनल असंतुलन नियंत्रित केले जाते. त्यानंतर आयव्हीएफची प्रक्रिया पार पाडली जाते. आयव्हीएफच्या प्रक्रियेत शुक्राणूंसह प्रयोगशाळेत अंड्याचे फलन होते व फलन प्रक्रियेनंतर तयार होणारे भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात स्थानांतरित होते. अशाप्रकारे आयव्हीएफच्या मदतीने गर्भधारणा करता येते. त्यामुळे जर तुम्हाला पीसीओडीची समस्या असेल आणि तुम्ही गर्भवती होऊ इच्छित असाल तर फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
हे सुध्दा वाचा – मूलबाळ न होण्याची कारणे व उपचार
Read Marathi language article about Polycystic ovary syndrome (PCOS) Causes, Symptoms, Diagnosis and Treatments. Last Medically Reviewed on February 21, 2024 By Dr. Satish Upalkar.