पनीर फूल (Paneer phool) :
पनीर फूल ही एक आयुर्वेदिक झुडूप वनस्पती असून तिला ऋष्यगंधा (Rishyagandha) नावाने ओळखले जाते. या झुडुपाला फुले येतात. त्या फुलांना ‘पनीर फुल’ असे म्हणतात. डायबेटिसमध्ये पनीर फुले विशेष गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
पनीर फूल ही वनस्पती पनीर डोडा किंवा इंडियन रेनेट या नावानेही ओळखली जाते. इंग्लिशमध्ये या वनस्पतीचे Withania coagulans असे नाव आहे. या वनस्पतीचा वापर काही आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. अनिद्रा, मानसिक ताण, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या आजारात या वनस्पतीचा वापर केला जातो.
स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवाची मधुमेह आजारात महत्वाची भूमिका असते. स्वादुपिंडाच्या बीटा सेल ह्या इन्सुलिनची योग्य प्रमाणात निर्मिती करीत असतात. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर आटोक्यात ठेवली जाते. आणि या इन्सुलिन स्त्रावाची शरीरात निर्मिती कमी होत असल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण राहत नाही. पर्यायाने ब्लड शुगर वाढते. या स्थितीला मधुमेह (डायबेटिस) असे म्हणतात.
पनीर फुल वापराचे फायदे :
पनीर फुलाच्या वापरामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींची झालेली हानी भरून काढण्यास काही प्रमाणात मदत होते. त्यामुळे पनीर फुलामुळे स्वादुपिंडाच्या बीटा सेल्स दुरुस्त होतात. स्वादुपिंडाच्या बीटा सेल्स दुरुस्त झाल्याने इन्सुलिनची निर्मिती होण्यास यामुळे मदत होते. इन्सुलिनची निर्मिती झाल्याने रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. अशाप्रकारे पनीर फुले डायबेटिसमध्ये कार्य करीत असतात.
डायबेटिस रुग्णांनी पनीर फुलाचा वापर कसा करावा ..?
ग्लासभर पाण्यात 2 ते 3 पनीर फुल रात्रभर भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हे पाणी गाळून घेऊन प्यावे. ब्लड शुगर आटोक्यात येण्यासाठी हा उपाय नियमितपणे काही दिवस करावा. अधिक प्रमाणात पनीर फुल वापरू नये.
पनीर फुल वापरताना काय काळजी घ्यावी ..?
पनीर फुल वापरण्यापूर्वी सर्वांनी ही गोष्ट आधी विचारात घ्यावी की, पनीर फुल हा डायबेटिसवरील सर्वोत्तम असा उपचार होऊ शकत नाही. याच्या योग्य वापराने काही प्रमाणात ब्लड शुगर आटोक्यात राहण्यास मदत होऊ शकते.
- पनीर फुलांचा योग्य व कमी प्रमाणातचं वापर करणे आवश्यक असते.
- जास्त प्रमाणात पनीर फुले वापरणे टाळावे.
- डायबेटिस रुग्णांनी पनीर फुलांचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
- आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे बंद करू नयेत.
- आपल्या डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घ्यावी.
- पनीर फुलांचा वापर सुरू असताना आपली ब्लड शुगर नियमितपणे चेक करावी.
- पनीर फुलांचा वापर सुरू असताना बेकरी पदार्थ, बिस्किटे, मैद्याचे पदार्थ, मिठाई, जंकफूड वैगेरे खाणे टाळावे.
Useful Article – डायबेटिस रुग्णाचा आहार कसा असावा याची माहिती जाणून घ्या.
पनीर फुलाचे नुकसान व तोटे (side effects) :
पनीर फुलाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास याचे काहीही दुष्परिणाम सहसा होत नाहीत. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. तीच गोष्ट सर्वच औषधांसाठीही लागू होते. पनीर फुलांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असते. याचा अतिवापर हा आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो.
त्यामुळे, लवकरात लवकर साखर कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात पनीर फुले वापरणे टाळावे. तसेच गरोदर स्त्रियानी आणि ज्यांना लो ब्लड शुगरची समस्या आहे अशा व्यक्तींनी पनीर फुलाचा वापर करू नये.
Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.