युरिक ऍसिडचा त्रास :
यूरिक एसिडचे प्रमाण शरीरात अधिक वाढल्यामुळे युरिक एसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना होऊन सांधेदुखी होत असते.
युरिक एसिडचा त्रास प्रामुख्याने पायाच्या अंगठ्यात सांध्यात झालेला आढळतो. तसेच गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या सांध्यामध्येही हा त्रास होऊ शकतो. या त्रासात सांध्यांना सूज येऊन अतिशय वेदना होत असतात त्यामुळे याठिकाणी युरीक एसिडचे प्रमाण कमी करण्यासाठीचे उपाय दिले आहेत.
यूरिक एसिड वाढल्यास हे करा घरगुती उपाय :
लसूण..
शरीरातील युरिक एसिड कमी करण्यास लसूण फार फायदेशीर असते. याकरिता लसूनच्या काही पाकळ्या चावून खाव्यात. याशिवाय लसूण पाकळ्या बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावावा.
आले..
आले खाण्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होते आणि सांध्यांना आलेली सूज कमी होऊन वेदना कमी होतात. त्यामुळे या त्रासात आले खूप उपयुक्त ठरते. याशिवाय आले बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यांवर दररोज एकदा लावणेही उपयुक्त असते.
हळद..
हळदीमुळेही सांध्यातील सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी दोन कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून मिश्रण 10 मिनिटे गरम करावे व हे मिश्रण थंड झाल्यावर प्यावे.
सैंधव मीठ..
सैंधव मिठामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. मॅग्नेशियम हा घटक युरिक एसिड कमी करण्यास खूप उपयोगी असतो. त्यामुळे सैंधव मीठ पाण्यात घालून ते गरम करून घ्यावे. थोडे कोमट झाल्यावर ते पाणी दुखणाऱ्या सांध्यावर लावावे.
एरंडेल तेल..
युरिक एसिडमुळे दुखणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोमट केलेले एरंडेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे संध्यातील सूज, वेदना कमी होऊन आराम मिळेल.
अक्रोड..
रोज दोन ते तीन अक्रोड खाल्ल्यामुळेही युरिक एसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
पुरेसे पाणी प्या..
युरिक एसिडचा त्रास असल्यास दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त युरिक एसिड लघवीवाटे शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.
आणि महत्त्वाचे म्हणजे शरीरात युरिक एसिड वाढवण्यास जबाबदार असणारे पदार्थ म्हणजे दारू-बियर, मासे, सीफूड, कोळंबी, झिंगा, खेकडे, मांसाहारी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चरबीचे पदार्थ, मटार, बेकरी प्रोडक्ट इत्यादी पदार्थ खाणे टाळावे.
Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.