क्षयरोग म्हणजे काय व टीबी रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार – TB disease in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

क्षयरोग – Tuberculosis :

क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.

क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.

क्षयरोगाची लक्षणे – TB symptoms in Marathi :

• तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
• ‎बेडकायुक्त खोकला येणे,
• थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
• ‎खोकताना छातीत दुखणे,
• श्वास घेण्यास त्रास होणे,
• ‎अशक्तपणा,
• भूक व वजन कमी होणे,
• ‎रात्री झोपल्यावर घाम येणे,
• ‎सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

क्षयरोग होण्याची कारणे – TB rog causes :

क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळे होतो. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकला किंवा शिंकेद्वारे हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्याच्या शरीरात पोहचून टीबीचा प्रसार करत असतात.

क्षयरोग होण्याचा धोका कोणाला जास्त असतो..?

लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्ती, HIV सारख्या गंभीर आजाराने पीडित रुग्ण, मधुमेही रुग्ण, अस्वच्छ आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी राहणारे व्यक्ती, धूम्रपान व मद्यपान आशा व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याचा धोका हा अधिक जास्त असतो.

TB चे निदान असे केले जाते :

रुग्णामधील लक्षणांवरून आणि शारीरिक तपासणी करून, स्टेथोस्कोपद्वारे तपासणी करून याचे निदान आपले डॉक्टर करू शकतात. याशिवाय रक्त चाचणी, थुंकीची व बेडक्याची तपासणी, छातीचा एक्स-रे इत्यादी चाचण्या टीबीच्या निदानासाठी करण्यात येतील.

क्षयरोगावर असे करतात उपचार – TB Treatments :

क्षयरोगावरील उपचारासाठी टीबीचे जीवाणू कमी करण्यासाठी विविध अँटिबायोटिक्स औषधे दिली जातात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आणि नियमित काही दिवस घेणे गरजेचे असते. टीबी रोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी साधारण सहा ते नऊ महिने अशी औषधे घेणे आवश्यक असते. मुख्य म्हणजे रुग्णाने औषधांचा उपचार कोर्स पूर्ण केला पाहिजे. क्षयरोगावरील उपचार सरकारी दवाखान्यात मोफत केले जातात.

मात्र असे न करता जर रुग्णाने मध्येच औषध घेणे थांबवल्यास क्षयरोगाचा संसर्ग परत होण्याची शक्यता असते. टीबी पुन्हा उद्भवल्यास ते बॅक्टेरिया पूर्वीच्या औषधांना दाद देत नाहीत त्यामुळे अशावेळी रुग्णावर उपचार करणे जास्त अवघड बनते. त्यामुळे टीबी रुग्णांनी दिलेली औषधे डॉक्टर सांगतील तोपर्यंत नियमित घेत राहावीत.

क्षयरोग रुग्णांसाठी असा असावा आहार – TB patients diet plan :

क्षयरोगाच्या रुग्णांनी योग्य आहार घेणे आवश्यक असते. योग्य आहार घेतल्याने रोगाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. टीबी झाल्यामुळे रुग्ण अशक्त बनलेला असतो. शरीराचा झालेला क्षय भरून काढण्यासाठी टीबीच्या पेशंटसाठी पौष्टिक आहार दिला पाहिजे. आहारात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे व क्षारतत्वे यांचा आवर्जून समावेश असला पाहिजे. टीबीच्या रुग्णांनी काय खावे व काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.

क्षयरोग झालेल्या रुग्णांनी काय खावे..?
टीबी रुग्णाच्या आहारामध्ये प्रोटिन्स असणारे पदार्थ समाविष्ट करावेत. क्षयरोगामुळे मांसपेशींची (मसल्सची) भरपूर झीज झालेली असते. त्यामुळेचं रुग्णाला अशक्त व कमजोर वाटत असते. म्हणून रुग्णाच्या आहारात मांसपेशीचे पोषण करणारे प्रोटिन्सयुक्त पदार्थ असले पाहिजेत. यासाठी दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी, डाळी, सुकामेवा यासारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश रुग्णाच्या आहारात करावा.

याशिवाय टीबीच्या पेशंटसाठी व्हिटॅमिन्स व खनिज घटकांचीसुद्धा गरज असते. यासाठी रुग्णाच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, संत्री, मोसंबी, गाजर, केळी, विविध प्रकारची धान्ये यांचा समावेश करावा.

टीबी पेशंटनी काय खाऊ नये..?
क्षयरोग झाल्यावर रुग्णांनी दारू, अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू अशी व्यसने करणे टाळले पाहिजे.

क्षयरोग झालेल्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी :

• डॉक्टरांनी दिलेली औषधे टीबीच्या रुग्णांनी नियमितपणे घ्यावीत.
• ‎डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.
• ‎मद्यपान, धूम्रपान, सिगारेटसारख्या व्यसनांपासून रुग्णाने दूर राहावे.
• ‎पोषक आहार, पुरेशी झोप घ्यावी.
• ‎टीबी झालेल्या रुग्णाने खोकताना, शिंकताना तोंडावर हातरूमाल धरावा.
• ‎टीबी झालेल्या रुग्णाने गर्दीच्या ठिकाणी जाणे, प्रवास करणे टाळावे.
• ‎रुग्णाच्या राहण्याची जागा ही मोकळी व खेळती हवा असणारी असावी.
• ‎घरातील इतर लोकांनीसुद्धा टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना – TB prevention tips :

क्षयरोग होऊ नये यासाठी लहान बाळांना BCG ची लस दिली जाते. BCG लसीकरणामुळे क्षयरोग होण्यापासून रक्षण होते. भारतात अनेक वर्षांपासून ही लस लहान मुलांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी क्षयरोगापासून बचाव होण्यास मदत झालेली आहे.

क्षयरोग (TB) संबंधित खालील आजारांची माहितीही वाचा..
न्यूमोनिया म्हणजे काय व त्यावरील उपचार
डांग्या खोकला होण्याची कारणे व लक्षणे

TB rog causes, symptoms, prevention & treatments information in Marathi