गर्भावस्था आणि प्रवास (Travel during Pregnancy) :
प्रेग्नन्सी हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा असा क्षण असतो. गरोदरपणात आईच्या गर्भाशयात बाळ वाढत असते. त्यामुळे गरोदर स्त्रीने प्रवास करताना अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी येथे गर्भावस्थेत कार, बस, रेल्वे, विमान किंवा जहाज यातून सुरक्षितपणे प्रवास कसा करावा, गरोदरपणात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती येथे दिली आहे.
गरोदरपणात प्रवास करावा की नाही..?
गर्भावस्थेत प्रवास करू शकतो का, असा प्रश्न अनेक गरोदर स्त्रियां विचारत असतात. मात्र आपण योग्य ती काळजी घेऊन गरोदरपणातही सुरक्षितपणे प्रवास करू शकता. गर्भावस्थेत प्रवास करताना प्रदूषित ठिकाणे, इन्फेक्टेड एरिया याठिकाणी जाणे टाळले पाहिजे. तसेच प्रवासादरम्यान आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते.
गर्भधारणेदरम्यान प्रवास कधी करू नये..?
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या 3 महिन्यात आणि शेवटच्या 3 महिन्यांत जास्त प्रवास करणे टाळले पाहिजे. कारण या कालावधीत जास्त प्रवासामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.
गरोदरपणी कधी प्रवास करणे टाळावे..?
जर गरोदर स्त्रीला पोटात दुखणे, डोकेदुखी, ताप, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा योनीतून रक्तस्राव होणे असे त्रास होत असल्यास प्रेग्नन्सीमध्ये प्रवास करु नये.
गरोदरपणात वाहनांवरून प्रवास करताना अशी घ्यावी काळजी :
• गरोदरपणात दुचाकीवरून प्रवास करणे टाळा.
• शक्यतो कार किंवा बसने प्रवास करावा. कारने प्रवास करताना सीटबेल्टचा वापर करावा.
• खड्डे असणाऱ्या रस्त्यावरून जाताना काळजी घेणे आवश्यक असते.
• वाहनांवरून लांबचा प्रवास करणे टाळा.
• लांबच्या प्रवासामध्ये थोड्या थोड्या अंतरावर गाडी थांबवून पाय मोकळे करावेत.
• प्रवासात आवश्यक ते सर्व साहित्य जसे की पाण्याची बाटली, औषधे आणि खाण्याचे पदार्थ बरोबर असावेत.
• प्रवासात बाहेरचे उघड्यावरील दूषित पदार्थ, दूषित पाणी पिणे टाळावे.
• प्रवासात आहार वेळेवर घ्यावा तसेच पुरेसे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
• मोबाईलमध्ये आपल्या डॉक्टरांचा नंबर सेव्ह केलेला असावा.
गर्भावस्थेत रेल्वेचा प्रवास करताना अशी घ्यावी काळजी :
गरोदरपणात रेल्वेचा (train) प्रवास करणे इतर वाहनांपेक्षा सुरक्षित असते.
• गर्दी व त्रास टाळण्यासाठी स्टेशनवर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा.
• रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असल्यास एसी कोचमध्ये सीट निवडा.
• रेल्वेने प्रवास करताना शक्यतो एकटीने प्रवास करू नका. शक्य असल्यास प्रवासात सोबतीला कोणाला तरी घेऊन जावे.
• प्रवासात आवश्यक ते सर्व साहित्य जसे की पाण्याची बाटली, औषधे आणि खाण्याचे पदार्थ बरोबर असावेत.
• ट्रेनमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ खाणे टाळा. यापेक्षा घरातून आपल्याबरोबर आणलेले खाद्यपदार्थ खावेत.
• प्रवासात आहार वेळेवर घ्यावा तसेच पुरेसे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
• लांबच्या प्रवासात अधिक वेळ बसून न राहता थोडे झोपून विश्रांती घ्यावी.
प्रेग्नन्सीमध्ये विमानाने प्रवास करताना अशी घ्यावी काळजी :
• आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं विमानाचा प्रवास करावा.
• प्रवासात आपल्यासोबत आवश्यक औषधे व गरोदरपणातील मेडिकल रिपोर्ट्स बरोबर असावीत.
• काही विमान कंपन्या गर्भवती महिलांना प्रवास करण्यास मनाई करतात. ही समस्या टाळण्यासाठी मेडिकल रिपोर्ट्स सोबत ठेवावेत.
• शक्यतो सैल कपडे आणि आरामदायक शूज वापरावे.
• फ्लाइट बुक करताना आपल्या डिलिव्हरीची तारीख विचारात घ्यावी. कारण गर्भधारणेच्या 36 व्या आठवड्यापूर्वीचं हवाई मार्गाने प्रवास केला पाहिजे.
• ज्या स्त्रियांना रक्तदाब समस्या त्यांनी गर्भधारणेच्या शेवटच्या दोन महिन्यांत विमान प्रवास करू नये.
गर्भारपणात जहाजाने प्रवास करताना अशी घ्यावी काळजी :
• आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं जहाजाने प्रवास करावा.
• प्रवासात आपल्यासोबत आवश्यक औषधे व गरोदरपणातील मेडिकल रिपोर्ट्स बरोबर असावीत.
• गर्भधारणेच्या 28 व्या आठवड्यानंतर जहाजाने प्रवास करण्यास मनाई असते. त्यामुळे सोबत मेडिकल रिपोर्ट्स ठेवावेत.
• प्रवासात आवश्यक ते सर्व साहित्य जसे की पाण्याची बाटली, औषधे आणि खाण्याचे पदार्थ बरोबर असावेत.
• प्रवासात आहार वेळेवर घ्यावा तसेच पुरेसे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
• एकचठिकाणी अधिकवेळ बसू नये. जहाजावरील मोकळ्या जागेत थोडे चालावे.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या
Read Marathi language article about Travelling During Pregnancy. Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.