उन्हाळा आणि डोळ्यांचे आरोग्य :
उन्हाळ्यातील प्रखर उन्हामुळे डोळ्यांच्या अनेक तक्रारी व आजार होत असतात. सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलट किरणांमुळे (UV किरणांमुळे) आपल्या शरीराबरोबरचं डोळ्यांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
प्रखर उन्हात जास्त वेळ राहिल्याने UV किरणांमुळे डोळ्यांवर ऍलर्जीक रिऍक्शन होते व डोळ्यांची जळजळ, आग आणि खाज होत असते. तसेच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये सुरकुत्यासुद्धा पडू लागतात.
उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्यावी काळजी :
1) स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवावेत..
उन्हाळ्यात वरचेवर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा आणि डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाईल तसेच उन्हामुळे डोळ्यांना होणारे त्रासही कमी होईल.
2) डोळ्यांना चोळू नका..
उन्हामुळे डोळ्यात खाज येत असते तसेच बाहेरील धूळ, कचरा, प्रदूषण डोळ्यात गेल्याने डोळ्यांची आग व जळजळ होत असते. अशावेळी डोळे चोळू नये. असा त्रास होत असल्यास स्वच्छ रुमालने डोळे पुसवेत किंवा थंड पाण्याने डोळे धुवून घ्यावेत.
3) दर्जेदार गॉगल आणि टोपी वापरावी..
उन्हाळ्यात सूर्यापासून निघणाऱ्या घातक UV किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी दर्जेदार सनग्लासेज वापरावे. उन्हाळ्यात बाहेर फिरताना डोळ्यात धूळ, कचरा जाऊ नये यासाठीही हे गॉगल उपयुक्त ठरते. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरचे स्वस्त गॉगल खरेदी करू नये. 100 टक्के UV किरणांपासून रक्षण करणारेच दर्जेदार गॉगल्स खरेदी करावेत. तसेच कडक उन्हात फिरताना डोक्यावर टोपी घालावी किंवा छत्रीचा वापर करावा.
4) पुरेसे पाणी प्यावे..
उन्हामुळे भरपूर घाम येत असतो. घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे डोळे कोरडी पडण्याची समस्या होऊ शकते. यासाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. साधारण 8 ते 10 ग्लास पाणी दिवसभरात प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहिल.
पाण्याव्यतिरिक्त नारळपाणी, फळांचे ज्यूस, लिंबूपाणी, कोकमचे सरबतही आपण उन्हाळ्यात पिऊ शकता.
Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 8, 2024.