डोळे जळजळणे – Burning Eyes :

काहीवेळा डोळ्यांची जळजळ होत असते. डोळ्यातील जळजळ ही प्रामुख्याने ऍलर्जी, डोळ्यातील कोरडेपणा, इन्फेक्शन, प्रखर ऊन, डोळ्यावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे होत असते.

डोळ्यांची जळजळ होण्याची कारणे :

डोळ्याची जळजळ होण्यामागे खालील कारणे असू शकतात.
• ऍलर्जी किंवा डोळ्यात जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) झाल्याने,
• प्रखर उन्हात फिरल्यामुळे,
• धूर किंवा धूळ, कचरा डोळ्यात गेल्यामुळे,
• तेल, साबण किंवा शैम्पू डोळ्यात गेल्याने,
• तिखट पदार्थ डोळ्यात गेल्यामुळे,
• अधिक काळ कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यामुळे,
• चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे,
• स्विमिंग पूलमधील क्लोरीनयुक्त पाण्यामुळे,
• पुरेशी झोप न मिळाल्यास,
• स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा टीव्ही यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांची जळजळ होत असते.

डोळ्यांची जळजळ होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत –
दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा व डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाते. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होत नाही.

डोळ्यांना चोळू नये –
डोळ्यात जळजळ होत असल्यास डोळे चोळू नयेत. कारण डोळे चोळल्याने हा त्रास जास्त वाढतो. तसेच डोळ्यात इन्फेक्शन असल्यास ते इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते त्यामुळे असा त्रास होत असल्यास स्वच्छ रुमालने डोळे पुसावे किंवा स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.

दर्जेदार गॉगल वापरा –
उन्हाळ्यात सूर्यापासून निघणाऱ्या घातक UV किरणांमुळे डोळ्यांची जळजळ होत असते. यासाठी उन्हाळ्यात बाहेर फिरताना डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी दर्जेदार सनग्लासेज वापरावे. डोळ्यात धूळ, कचरा जाऊ नये यासाठीही हे गॉगल उपयुक्त ठरते.

स्मार्टफोन, टीव्ही चा मर्यादित वापर करा –
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टिव्ही यांचा मर्यादित वापर करावा. या उपकरणांचा सलग वापर करणे टाळावे. कारण यांच्या अतिवापराने डोळ्यांवर अधिक ताण येत असतो. त्यामुळे अशी उपकरणे वापरताना डोळ्यांना 15 – 20 मिनिटांनी विश्रांती द्यावी.

डोळे जळजळणे यावर हे करा घरगुती उपाय :

काकडी –
डोळे जळजळत असल्यास फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळे जळजळणे कमी होते.

बटाटा –
बटाट्याचे कापसुद्धा डोळ्यांची जळजळ होत असल्यास उपयोगी ठरतात. यासाठी ताजा बटाटा घेऊन त्याचे काप डोळ्यावर ठेवावेत. यामुळे डोळ्यात जळजळ होणे कमी होते.

गुलाब जल –
गुलाबजलात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावेत किंवा एक थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही डोळ्यातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

तेल मालिश –
रोज रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यांची जळजळ होणे थांबते.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
डोळे लाल होण्याची समस्या असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.