Precautions during first three months of pregnancy in Marathi.

गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात घ्यावयाची काळजी :

गरोदरपणाचे पहिले तीन महिने हे अतिशय महत्त्वाचे असतात. कारण या पहिल्या तीन महिन्यात गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने, जराशा चुकीनेही गर्भस्त्राव (Abortion) होऊ शकतो.

म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, विहार, मानसिक स्थिती या सर्वांवर लक्ष ठेवावे लागते. यासाठी गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यात घ्यावयाची काळजी, आहार, विहार याविषयीची माहिती याठिकाणी दिली आहे.

सहज पचणारा संतुलित आहार घ्या..

गरोदरपणातील सुरवातीच्या तीन महिन्यात मळमळणे, उलट्या होणे यासारख्या समस्या असतात. पहिल्या दोन महिन्यात खाण्याची इच्छा होत नाही तर तिसऱ्या महिन्यात अचानक वरचेवर भूक लागल्याचेही जाणवू शकते. अशावेळी आपणास आवडणारा आहार खावा. गरोदरपणात नेहमी ताजा, संतुलित व सहज पचणारा आहार घ्यावा.

प्रेग्नन्सीमध्ये सुरवातीच्या काही दिवसात मळमळ व उलट्या होत असल्यास सकाळी उठल्यावर थोडे कुरकुरीत टोस्ट, बिस्किटे किंवा सुखामेवा खाणे उपयुक्त ठरते. दिवसातून तीन ते चार वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. एकाचवेळी भरपेट खाणे टाळावे. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. तर रात्रीच्या आहारात प्रोटिन्स असणारे दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे असे पदार्थ खाऊ शकता.

गरोदरपणात आहारात पोळी, भात, डाळी, भाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असणारे दूध व दूधाचे पदार्थही आहारात असावेत. त्यामुळे बाळाचे हाडे मजबूत होण्यास मदत होईल. मांसाहार करत असल्यास अंडी, मांस, मासे यांचाही आहारात समावेश करू शकता.

गरोदरपणात तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, चरबी वाढवणारे पदार्थ, फास्टफूड खाणे टाळावे. तसेच शिळे अन्न, बाहेरील उघड्यावरील पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.

गरोदरपणात उपवास व डाएट करणे टाळावे. यामुळे तुम्ही तसेच तुमचे बाळ व्हिटामिन, लोह व फॉलीक ऍसिड, खनिजे यासारख्या अत्यावश्यक पोषकद्रव्यापासून दूर रहाल. याचा विपरित परिणाम आपल्या व बाळाच्या आरोग्यावर होईल.

अतिश्रमाची व थकवा आणणारी कामे करणे टाळा..

गरोदरपणात हलकी फुलकी कामे करायला काहीच हरकत नाही. स्वयंपाक करणे, झाडलोट करणे अशी सहज करता येण्याजोगी पण कमी श्रमाची कामे करावीत.

मात्र थकवा आणणारी कामे टाळावित. गरोदरपणात जड वस्तू उचलणे-ढकलणे, शिडीवर चढणे अशी कुठलीही कामे करू नयेत. पाण्याचा हंडा वर उचलणे किंवा डोक्यावरून आणणे टाळावे. म्हणजे सारासार विचार करून अतिश्रमाची व पोटावर ताण पडतील अशी कामे टाळावीत. तसेच अशक्तपणा जाणवल्यास आराम करावा.

पुरेशी झोप व विश्रांती घ्या..

गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे थकवा जाणवतो त्यामुळे शक्य तेव्हा थोडासा आराम जरूर करावा. गरोदरपणात पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. यासाठी रात्री 8 ते 9 तास शांत झोप मिळाली पाहिजे.याशिवाय दुपारीही 1 ते 2 तास झोप किंवा विश्रांती घेतली पाहिजे.

लांबचा प्रवास करणे टाळा..

गरोदरपणात प्रवास करावा का? असा अनेकजणींचा प्रश्न असतो. गरोदरपणात लांबचा प्रवास करणे टाळावे. पहिल्या तीन महिन्यामध्ये अधिक प्रवासामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. याशिवाय दुचाकीवरुन प्रवास करणे शक्यतो टाळावे.

वैयक्तिक स्वच्छता ठेवा..

गर्भावस्थेत दररोज अंघोळ करण्याने ताजेतवाने वाटते.
मात्र अतिशय गरम पाण्याने स्नान करणे टाळावे. यामुळे तुम्हाला डीहायड्रेशनचा त्रास व थकवा जाणवू शकतो परिणामी बाळाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे.

स्नान करताना स्तन आणि गुप्तांगांना स्वच्छ पाण्याने धुवावेत. तसेच स्तनास चिरा पडल्या असल्यास रोज तेल लावावे म्हणजे बाळाला पुढे दूध पिताना त्रास होणार नाही.
नवजात बालक हा सर्वस्वी मातेच्या दुधावर अवलंबून असल्याने गर्भावस्थेतच स्तनांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी स्तनांची स्वच्छता ठावावी. आपल्या डॉक्टरांकडून यासंदर्भात विशेष मार्गदर्शन घ्यावे.

गरोदरपणात सैलसर, हलके, आरामदायी, स्वच्छ वस्त्रे घालावीत. पोट, स्तन यावर वस्त्रांचा दाब येणार नाही याची दक्षता घ्यावी तर उंच टाचांच्या चपला घालू नये. याशिवाय जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे टाळावे.

नियमित तपासणी करावी..

गरोदरपणात नियमित चेकअप केल्याने गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवता येते व भविष्यातील धोके टाळण्यास मदत होते. गरोदरपणात तिसऱ्या महिन्यापासून नियमितपणे दवाखान्यात डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

डॉक्टरांनी दिलेलीचं औषधे घ्या..

गर्भावस्थेपुर्वी जर आपण निद्रादायक, चिंताहर, वेदनाहर औषधांचे सेवन करत असल्यास, आपल्या डॉक्टरांना त्या औषधांची कल्पना देणे गरजेचे आहे. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (FDA) औषधांचे वर्गीकरण गर्भास असलेल्या संभाव्य धोक्यानुसार केले आहे. काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतींनी ती कधीही घेऊ नयेत कारण त्यांमुळे गर्भावर दुष्यरिणाम होऊन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये गंभीर व्यंगे उद्भवू शकतात.

यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणे टाळा. कारण त्या औषधांचा दुष्परिणाम गर्भावर होण्याची शक्यता अधिक असते. औषधांच्या अतिसेवनाचाही गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेले औषध दिलेल्या प्रमाणामध्येचं घ्यावीत.

योग्य व्यायाम करा..

गरोदरपणी सुरवातीपासुनच थोडातरी व्यायाम रोज करावा त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढेल, मांसपेशी सक्रिय होतात, पाठदुखीपासून आराम मिळेतो तसेच तुम्ही शारीरिक बदलास सामोरे जाऊ शकाल. मात्र व्यायाम आपल्या डॉक्टरांच्या सुचनेनुसार सुरू करावा.

ज्यांना दिवसभर काही ना काही कामे करावे लागते त्यांना व्यायामाची फारशी आवश्यकता नसते ही गोष्ट खरी असली तरी बाळंतपण सुलभ होण्याच्या दृष्टीने हलका-फुलका व्यायाम हा चांगला ठरतो. चालण्याचा व्यायाम, मोकळ्या हवेत फिरायला जाणे अधिक चांगले असते. काही सहज सुलभ योगासनेही तज्ञांच्या सल्ल्याने करता येतील.

तणावापासून दूर राहा..

गरोदरपणात मानसिक ताण येण्याची अधिक शक्यता असते. यासाठी कोणताही ताण घेऊ नये. ताण घालवण्यासाठी संगीत ऐकणे, विविध पुस्तके वाचणे, प्राणायाम-ध्यान धारणा करणे असे उपाय करू शकता.

शारिरीक संबंध टाळा..

गरोदरपणात संबंध ठेवू शकतो का? असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. गरोदरपणात शारिरीक संबंध शक्यतो टाळावेत कारण, पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो. शेवटच्या तीन महिन्यामध्ये संबंध ठेवल्यास केल्यास अकाली प्रसुती (प्री मॅच्युअर) होते तसेचं गर्भाशयात इन्फेक्शन होण्याचाही धोका वाढतो.

मद्यपान, धुम्रपान यासारखी व्यसने करू नका..

अल्कोहोल, तंबाखू आणि धुम्रपानामुळे (Smoking) बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो तसेच बाळाच्या अकाली जन्माची (pre-mature) शक्यता वाढते.
धुम्रपानाच्या सवयीमुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते.

गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भावर ठळकपणे दिसणारा परिणाम म्हणजे नवजाताचे वजन अत्यंत कमी असणे. गर्भवती स्त्री जितके जास्त धूम्रपान करेल तितक्या प्रमाणात नवजाताचे वजन कमी होत जाते. तसेच गरोदर स्त्रीने सेकंडहँड स्मोक अर्थात दुसरी व्यक्ती स्मोकिंग (धूम्रपान) करीत असताना त्या सिगारेटच्या धुरामध्ये राहू नये. कारण त्यामुळेही गर्भावर असेच घातक परिणाम होऊ शकतात.

precautions during pregnancy for first 3 months in marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...