अवयवदान (Organ donation) :
अवयवदान हे मृत्युनंतर आणि जीवंत असतानाही केले जाते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या नातलगास अवयवदान करु शकते. जेंव्हा एखादी जीवंत व्यक्ती अवयवदान करते, तेंव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवास धोका नसतो. तरीही त्या जीवंत व्यक्तीतील एक अवयव कमी होतो, हे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते.
यासाठी जीवंत व्यक्तींनी अवयवदान करण्याची संख्या कमी करणे गरजेचे आहे. यासाठी मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. अवयवदान जागृतीसाठी 13 ऑगस्ट हा दिन जागतिक अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो.
अवयव दान काळाची गरज –
सामान्यतः एक मृत्यदेह सात जणांना जीवनदान देतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. याचा अर्थ एका मृतदेहामुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्वरत जगण्यास मदत होते. यासाठी मृत्युपश्चात अवयवदान करण्यासंबंधी जनजागृकता समाजामध्ये होणे गरजेचे आहे. समाजात अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया थंडावत चालल्याचे चित्र आहे.
किती तासांत अवयव प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे..?
- डोळ्यांचे जतन मृत्युनंतर काही महिन्यांपर्यंत करता येते.
- हाडे आणि त्वचा कितीही काळापर्यंत जतन केली जाऊ शकते.
- चार तासापर्यंत हृद्य जतन करता येते.
- सहा तासापर्यंत फुप्फुस, त्वचा जतन केले जाऊ शकते.
- बारा तासापर्यंत यकृत जतन केले जाऊ शकते.
- किडनी 48 तासापर्यंत जतन करता येते.
कोण असू शकतो अवयवदाता..?
18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती ऐच्छिक अवयवदान करु शकते. तर 18 वर्षाखालील मुलांना अवयवदान करायचे असल्यास त्यांच्या पालकांची परवानगी लागते. लाईफसपोर्ट सिस्टीमवरील ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास त्यांचे अवयव दान होऊ शकते. नैसर्गिक मृत्यू झालेला असल्यास त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते. रक्तदानाविषयी माहिती जाणून घ्या..
कोणत्या प्रसंगी देहदान स्वीकारला जात नाही..?
अनैसर्गिक मृत्यू जसे, आत्महत्या, अपघात, अपराध, जळून अथवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास तसेच एड्स किंवा अन्य संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास आणि विहित नमुन्यात मृत्यूपत्र नसल्यास देहदान स्वीकारला जात नाही.
अवयवदान म्हणजे.. “मरावे परी देहरुपी उरावे” –
लक्षात ठेवा, एक मृत्यदेह सात जणांना जीवनदान देऊ शकतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो. याचा अर्थ एका मृतदेहामुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्वरत जगण्यास मदत होते. म्हणून हे लक्षात ठेवा.. ‘अवयव दान श्रेष्ठदान’