Blood donation benefits & information in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar.
रक्तदानाचे महत्व :
एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.
रक्तदान हेच जीवनदान –
निरोगी व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. ब्लड बँक रेफ्रिजरेटरमध्ये रक्त 4 ते 5 आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षीत ठेवले जाते.
रक्तदान कोण करु शकतो..?
- ज्यांचे वय 18 ते 65 वर्षा पर्यंत आहे अशा व्यक्ती रक्तदान करु शकतात,
- वजन 48 किलो पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्ती,
- ज्यांनी मागील तीन महिन्यापासून रक्तदान केले नाही अशा व्यक्ती,
- क्षयरोग (TB), फिरंग, हिपाटायटिस, मलेरिया, मधुमेह आणि एड्स ह्या विकारांनी पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करु शकतात.
तर गर्भावस्था आणि स्तनपानकाळ सुरु असणाऱ्या स्त्रियांमधील रक्तदान घेतले जात नाही. प्रसुतीनंतर सहा महिन्यानंतर स्त्रिया रक्तदान करु शकतात.
किती रक्त घेतले जाते..?
दररोज आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी 350 ml रक्त घेतले जाते. तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पुर्ति करत असते.
कोठे कराल रक्तदान..?
रक्तदान कोणत्याही लाईसेन्स युक्त ब्लड बँकेमध्ये करता येते. याशिवाय सरकारी रुग्णालयांमध्येही रक्तदानाची सुविधा उपलब्द असते. याशिवाय मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था जसे रोटरी क्लब, लायंस क्लब इ. द्वारा वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
रक्त दिल्यानंतर केले जाणारे परिक्षण –
रक्त घेतल्यानंतर ब्लड बँकेमध्ये देण्यापुर्वी रक्ताच्या प्रत्येक युनिटचे परिक्षण करुन ते मलेरिया, सिफलिस, हिपॅटायटीस आणि एड्स (HIV) या संसर्गजन्य रोगांपासून संक्रमित नसल्याची खात्री केली जाते. कारण सुरक्षीत रक्तचं रुग्णास मिळाले पाहिजे ह्यासाठी हे परिक्षण केले जाते.
रक्तदानावेळी कोणता त्रास होतो का..?
नाही, रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. रक्तदान करण्यासाठी 5 ते 10 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. रक्तदान केल्यानंतर आपण आपली दररोजची कार्ये अगदी दररोज प्रमाणेच करु शकता. रक्तदाताच्या सामान्य आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम रक्तदानाने होत नाही.
रक्तदाता कार्ड –
स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तिंना रक्तदान केल्यानंतर लगेच रक्तदाता प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे रक्तदान केल्यानंतर 12 महिन्यापर्यंत रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास ब्लड बँकेतर्फे एक युनिट रक्त दिले जाते.
मग चला आपण रक्तदान करुया आणि अनेकांना जीवनदान देऊया.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
अवयवदानाचे महत्त्व आणि अवयवदानाची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.