मूळव्याध पथ्य आणि अपथ्य –
वेळीअवेळी जेवणे, अयोग्य आहार, तिखट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे, पोट साफ न होण्याच्या तक्रारी, सतत बैठे काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे गुद्वारापाशी कोंबासारखी गाठ निर्माण होऊन मूळव्याधचा त्रास (Piles) होऊ लागतो. यामुळे गुद्वाराच्या ठिकाणी सूज, वेदना आणि आग होऊ लागते तर काहीवेळा शौचावाटे रक्तही पडते.
मूळव्याधीचा त्रास असल्यास योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते. कारण जर मूळव्याध असल्यास पचनास जड असणारे पदार्थ खाल्यास पोट साफ होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊन शौचाच्या वेळी त्याठिकाणी प्रचंड वेदना होत असतात.
तर तिखट, खारट व मसालेदार पदार्थ खाल्यास गुदाच्या ठिकाणी जळजळ व सूज अधिक येत असते. यासाठी मूळव्याधमध्ये आहाराचे पथ्य संभाळावेच लागते. यासाठी याठिकाणी आयुर्वेदानुसार मूळव्याधमध्ये सांगितलेले पथ्य व अपथ्य यांची माहिती दिली आहे.
मूळव्याध आजारामध्ये हे आहे पथ्य करावे :
मूळव्याध असल्यास आहारात जुने तांदूळ, ज्वारी, गहू, कुळीथ, मूग, तूर वापरावे. पडवळ, भेंडी, दुधी, तोंडली, वांगी, परवर, पालक, घोळ, शेपू, सुरण कंदमुळ यासारख्या भाज्या खाव्यात. लिंबू, आवळा, अंजीर, केळी, पिकलेला पेरू, काळी द्राक्षे, डाळींब इ. फळे खावीत. दूध, तूप लोणी, ताक यांचा समावेश असावा. बडिशेपेचे पाणी, जिरे घालून उकळलेले पाणी प्यावे.
मूळव्याध आजारामध्ये हे आहे अपथ्य करावे :
मूळव्याध मध्ये पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. यामध्ये मटार, वाल, वाटाणे, चणे, चवळी, मटकी, उडीद, मका, वरीचे तांदूळ, मैद्याचे बेकरी प्रोडक्ट, चिकण, अंडी खाणे टाळावे. मसालेदार, तिखट, खारट पदार्थ वारंवार खाणे टाळावे. तळलेले तेलकट पदार्थ, शेंगदाणे, पापड, लोणची, मांसाहार जास्त प्रमाणात खाणे वर्ज्य करावे.
हे सुध्दा वाचा – मूळव्याधची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about piles pathya (diet plan). Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.