हे आहेत मूळव्याधवरील आयुर्वेदिक उपाय आणि औषध उपचार

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मूळव्याध आणि आयुर्वेदिक उपाय :

वेळीअवेळी खाणे, तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन, बद्धकोष्ठता, सतत बसून काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो. अनेक आयुर्वेदिक औषधे मूळव्याध उपचारासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांच्या वापराने मूळव्याधच्या त्रासापासून पूर्णपणे मुक्त होता होते.

मूळव्याधीत गुद्वाराजवळ सूज, आग होणे, वेदना होणे तर काहीवेळा शौचावाटे रक्त पडणे असा त्रास होऊ लागतो. मूळव्याधला आयुर्वेदात अर्श असेही म्हणतात. याठिकाणी मूळव्याधवरील आयुर्वेदिक उपाय आणि औषध उपचार यांची माहिती दिली आहे.

आयुर्वेदानुसार मूळव्याधीचे शुष्क अर्श आणि रक्तार्श असे दोन प्रकार होतात. शुष्क अर्श यामध्ये मूळव्याधमध्ये कोंब येतात, त्याठिकाणी वेदना, आग होणे आणि खाज ही लक्षणे असतात. पण या प्रकारात रक्त पडत नाही. तर रक्तार्श या प्रकारात वेदना, आग होणे यासारख्या लक्षणाबरोबर मूळव्याधमुळे रक्तसुद्धा पडत असते.

मूळव्याधवर हे आहेत आयुर्वेदिक औषध उपचार :

एरंडाची पाने –
एरंडाची दोन पाने थोडे मीठ घातलेल्या कोमट पाण्यातून स्वच्छ धुवून ती पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. स्वच्छ फडक्याच्या साहाय्याने मिश्रण गाळून घ्यावे. हा तयार केलेला रस सलग चार दिवस सकाळी उपाशीपोटी घ्यावा. मूळव्याधच्या त्रासाला हे खात्रीशीर आयुर्वेदिक औषध आहे.

सुरण –
आयुर्वेदानुसार सुरण हे कंदमुळ मूळव्याधीत उत्तम मानले जाते. त्यामुळे मूळव्याधीत सुरण उकडून ते ताकाबरोबर काही दिवस घेतल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. मूळव्याधीच्या त्रासात सुरण हे कंदमुळ अत्यंत उपयुक्त ठरते.

जिरेपूड –
मूळव्याधीचा त्रास असल्यास जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये.

त्रिफळा चूर्ण –
मूळव्याधमध्ये पोट साफ न होत असल्यास त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक औषध खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

एरंडेल तेल –
पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेलही उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे. एरंडेल तेल गुदभागी लावल्याने त्याठिकाणी आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

लिंबू आणि सैंधव मीठ –
ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात सैंधव मीठ (काळे मीठ) चिमूटभर टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा उपाय केल्यास मूळव्याधचा त्रास कमी होण्यास मदत होईल. याशिवाय सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लाऊन लिंबू चोखून खाणेही फायदेशीर ठरते.

दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. यामुळेही मूळव्याधचा त्रास कमी होण्यास मदत होते.

ताक –
जिरेपूड घालून ताक पिण्यामुळेही मूळव्याधचा त्रास लवकर कमी होतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मूळव्याध आयुर्वेदिक पथ्य :

मूळव्याधीचा त्रास असल्यास पचनास हलके असणारे पदार्थ आहारात समावेश करावेत. यामध्ये तांदूळ, ज्वारी, मूग, कुळीथ, जिरे, हळद, मुळा, दुधीभोपळा, पालक, सुरण, अंजीर, दूध, ताक, लोणी, तूप यासारखे पदार्थ खावेत

मूळव्याध आयुर्वेदिक अपथ्य :

मूळव्याध झाल्यास पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत. मांसाहार, चिकन खाणे शक्यतो टाळावे. मटार, वाल, पावटा, चवळी, उडीद, चणे यासारखी जड कडधान्ये खाणे टाळावे.

Web title – Get information about Mulvyadh ayurvedic treatment in Marathi.