भूक का लागत नाही ..?
बऱ्याचजणांना व्यवस्थित भूक न लागण्याची समस्या असते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने आजारपण, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, ताणतणाव अशा विविध कारणांमुळे पुरेशी भूक लागत नाही. अशावेळी पुरेसे अन्न पोटात न गेल्याने अशक्तपणा, थकवा यासारख्या समस्याही यामुळे होऊ शकतात.
भूक लागत नाही यावरील घरगुती उपाय –
भूक लागत नसल्यास दोन ते तीन काळी मिरी आणि लवंग यांच्या चुर्णात मध मिसळून खावे. यामुळे भूक लागते व अन्न पचण्यास मदत होते. तसेच लवंग, लेंड पिंपळी यांच्या चुर्णात अर्धा चमचा मध मिसळून खाल्याने देखील भूक चांगली लागते. पोट साफ न झाल्याने भूक लागत नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे. याशिवाय गरम भातात थोडेसे तूप व मिरी पावडर मिसळून खाल्याने भूक लागण्यास मदत होते. भूक लागत नसल्यास हे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.
भूक लागत नसल्यास काय करावे ..?
- भूक लागत नसल्यास सहज पचणारा आहार घ्यावा.
- एकाचवेळी भरपेट खाण्यापेक्षा तीन ते चार वेळा थोडे थोडे खावे. यामुळे घेतलेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन भूक लागते.
- जेवणाआधी एक तास पाणी पिऊ नका. कारण पाण्याने पोट भरल्याने जेवताना भूक लागत नाही.
- जेवल्यावर ओवा आणि सैंधव मीठ हे एकत्र करून अर्धा चमचा मिश्रण खावे.
- फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, आईसक्रीम वारंवार खाणेपिणे टाळावे.
- काहीवेळा तेच ते पदार्थ खाल्याने भूक लागत नाही. यासाठी खाद्यपदार्थांमध्ये थोडे बदल करावेत. अशावेळी आवडीचे पदार्थ खावेत.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- वर्षातून एकदा कृमी व जांतावरील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर घ्या.
- नियमित अर्धा तास व्यायाम करावा. व्यायामामुळे कॅलरिज बर्न झाल्याने कडाडून भूक लागण्यास मदत होते.
- चालणे, पळणे, सायकलिंग, मैदानी खेळ यासारखे व्यायाम करू शकता.
- तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशा विविध व्यसनांपासून दूर राहावे.
अशी काळजी घेतल्यास भूक व्यवस्थित लागण्यास निश्चितच मदत होईल.
हे सुध्दा वाचा – तोंडाला चव येण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या..
Read Marathi language article about Loss of appetite Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.