अंगावरून पांढरे पाणी जाणे – श्वेतप्रदर (Leukocoria) :
श्वेतपदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे हा त्रास नेहमीचाचं असे समजून दुर्लक्ष करावा किंवा लाज वाटते, संकोच वाटतो म्हणून लपून ठेवावा असाही नाही. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी शरीरातून जाणे हे सामान्य आहे. परंतू त्याचे प्रमाण किंवा रंग बदलणे हे योनीतील इंन्फेक्शन तसेच अनेक आजारांचे लक्षणही ठरू शकते.
अंगावरून पांढरे का जाते..?
मासिकपाळी येण्याच्या काही दिवस आधी काही स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे किंवा गर्भधारण झाली असताना किंवा संभोगानंतर असा योनीमार्गातून पांढरा चिकट स्राव कळतनकळत जाणं नॉर्मल असतं. पण जाणवण्याइतपत सतत योनीमार्गातून स्त्राव जाणं, त्याचं प्रमाण वाढणं, त्या स्त्रावाला वास येणं, त्याबरोबर कंबरदुखी, योनीमार्गाच्या आत आणि बाहेरील बाजूस खाज सुटणं यासारख्या तक्रारींकडे स्त्रीयांनी निश्चितच दुर्लक्ष करू नये.
अंगावरून पांढरे जाण्याची कारणे :
महिलांच्या किंवा मुलींच्या अंगावरून पांढरे का जाते याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- योनी आणि गर्भाशयातील इंन्फेक्शन (जंतूप्रादूर्भाव) हे याचे प्रमुख कारण असते,
- याशिवाय गर्भाशयाला सूज आल्याने,
- गर्भाशयाच्या मुखाला जखमा झाल्यामुळे,
- सतत गर्भपात झाल्याने,
- गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशयाचा कॅन्सर, बीजकोषाचा ट्यूमर, गुप्तरोग, अंग बाहेर येणे या विकारांमुळेही अंगावरून पांढरे जाऊ शकते.
- मानसिक ताण-तणावामुळे स्त्रीयांमध्ये पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढते.
धोक्याचा इशारा केंव्हा..?
अंगावरून पांढर जातं या तक्रारीसाठी आलेल्या बहुतांश स्त्रीयांमध्ये कोणताही रोग आढळत नाही. मात्र काही लक्षणांकडे प्रत्येकीनं बारकाईनं बघायला हवं. अतिरिक्त प्रमाणात शरीरातून पांढरे पाणी जाण्यासोबतच खालील लक्षण आढळल्यास त्वरीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- योनिमार्गात खाज सुटणे.
- योनिमार्गात आग होणे, जळजळ होणे.
- स्त्रावाला घाण वास येणे.
- पांढर्या किंवा दुधी रंगाऐवजी स्त्रावाला पिवळा किंवा लाल अथवा हिरवा रंग येणे.
- ताप येणे, कंबर, पोट दुखणे.
श्वेतपदराबरोबर जर वरीलपैकी कोणतीही तक्रार असल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्यावे.
अंगावरून पांढरे जाणे यावर उपाय :
- नेहमी संतुलित आहार घ्यावा.
- आहारात निरनिराळय़ा प्रकारच्या फळभाज्या,पालक, मेथी, लाल माठ यासारख्या पालेभाज्या, निरनिराळय़ा कोशिंबिरी किंवा सालाड्स यांचा समावेश करावा. जेवण्याच्या वेळा नियमित असाव्यात.
- एक चमचा भरडलेल्या मेथीचं चूर्ण आणि एक चमचा गूळ काही दिवस सेवन केल्याने ही समस्या दूर होते.
- शंभर ग्रॅम कुळीथ शंभर ग्रॅम पाण्यात उकळावं. त्यानंतर उरलेलं पाणी गाळून ते पाणी प्यायल्यानेही आराम मिळतो.
- श्वेतप्रदर या विकारांवर अशोकारिष्ट, पुश्यानुग चूर्ण यासारख्या आयुर्वेदिक अौषधांचा खुप चांगला उपयोग होतो. यासाठी तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्त्री आरोग्यविषयक खालील माहितीही वाचा..
Read Marathi language article about Leukocoria causes, symptoms and treatment. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.