मुतखडा – Kidney stone :
बऱ्याच लोकांमध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असते. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात.
मुतखडा कसा तयार होतो..?
शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा होतो. किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात. बहुतांशवेळा किडनी स्टोन्स हे कॅल्शियम पासून बनलेले आढळतात. तसेच युरीक एसिड आणि ऑक्सॅलेटपासूनही किडनी स्टोन्स बनतात.
हाय प्रोटीनयुक्त पदार्थ, खारट पदार्थ, कॅल्शियमचे पदार्थ अधिक खाण्यामुळे मुतखडे होऊ शकतात. व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियमची औषधे गोळ्या अधिककाळ घेत राहिल्याने लघवीत कॅल्शियमची पातळी वाढू शकते.
मुतखडा होण्याची कारणे (Kidney stone causes) :
- कमी पाणी पिण्याची सवय.
- आहारात प्रोटीन्स आणि सोडियम व कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यास किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात.
- विहीर किंवा बोरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरल्याने.
- लघवी बराच वेळ मुत्राशयात रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे.
- लघवीतील जिवाणू संक्रमनामुळे (बॅक्टेरियल इन्फेक्शनममुळे).
- हायपरपॅराथायरॉईड ह्या थायरॉईड समस्येमुळे,
- लठ्ठपणामुळे,
- तसेच कुटूंबात किडनी स्टोनचा त्रास असल्यास अनुवंशिकत्यामुळेही मुतखडा होण्याचा त्रास होऊ शकतो.
मुतखडा लक्षणे (Kidney stones symptoms) :
- मुतखड्याच्या त्रासात पाठीत व ओटीपोटात अतिशय वेदना होतात.
- ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
- लघवी करताना त्रास व जळजळ होते.
- वारंवार लघवीस झाल्यासारखे वाटते पण थेंब थेंब लघवीला होते.
- काहीवेळा लघवीतून रक्तही पडते.
- लघवी थुंबून राहिल्यास मळमळ व उलट्या होतात.
- यामुळे ताप येणे, अंगदुखी असे त्रास ही होऊ शकतात.
अशी मुतखड्याची लक्षणे असतात.
मुतखड्यांचे निदान (diagnosis test) :
लक्षणे व तपासणीवरून मुतखडा असल्याचे निदान डॉक्टर करू शकतात. तसेच मुतखड्याच्या निदानासाठी खालील वैद्यकिय चाचण्याही केल्या जातील.
- सोनोग्राफी तपासणी – सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचा आकार किती आहे, मूतखडा कोणत्या भागात आहे ते समजते.
- KUB एक्स रे – याद्वारे किडनी, युरेटर आणि मुत्राशयाची स्थिती पाहिली जाते.
- याशिवाय रक्त, लघवी तपासणी, सीटी स्कैन परिक्षण, किडनी फंक्शन टेस्ट याद्वारे मुतखड्यांचे निदान केले जाते.
मुतखड्यांचा किडनीवर काय परिणाम होतो..?
मुतखड्यांमुळे लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडनीत तयार झालेली लघवी ही मुत्रमार्गातून सरळ खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडनीवर ताण येतो व किडनी फुगते.
जर या मुतखड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत तर दीर्घकाळ फुगून राहीलेली किडणी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते. त्यामुळे किडनी फेल्युअर किंवा किडणी निकामी होण्याचा धोका असतो. याशिवाय किडन्यांमध्ये इन्फेक्शन होणे, युरिनरी फिस्टुला निर्माण होणे यासारखा त्रास मुतखड्यांमुळे होऊ शकतो.
मुतखडा आणि उपाय :
- दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे लघवीवाटे मुतखडे निघून जाण्यास मदत होते.
- दररोज चमचाभर लिंबाच्या रसात एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे.
- दररोज तुळशीचा रस किंवा पाने चावून खल्यानेही किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
- सकाळी उपाशीपोटी कांद्याचा रस प्यावा. याच्या नियमित सेवनाने मुतखडे बारीक होऊन लघवीवाटे बाहेर पडतात.
- डाळींबाचा रस किंवा शहाळ्याचे पाणी पिणेही किडनी स्टोनवर उपयोगी असते.
मुतखडा आणि उपचार (Kidney stones treatments) :
मुतखडा कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या भागात आहे तसेच त्याचा आकार किती आहे त्यानुसार यावरील उपचार ठरतात. मुतखडा लहान असल्यास औषध उपचारांनी तो बारीक होऊन पडुन जाऊ शकतो. तर मोठ्या आकाराचे किडनी स्टोन असल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून ते मुतखडे काढावे लागू शकतात.
एकदा मुतखडा पडून गेल्यास किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास पुन्हा खडा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक मुतखडा झालेल्यांनी योग्य पथ्य पाळणे आवश्यक असते.
मुतखडा होऊ नये यासाठी काय करावे..?
- भरपूर पाणी प्यावे. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.
- लघवी कधीही अडवून धरू नये. दोन तासापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहू नये.
- जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे. 4 ग्रॅम पेक्षा अधिक मिठाचा वापर आहारात असू नये.
- वजन आटोक्यात ठेवा.
- शीतपेये, अतितेलकट पदार्थ, आंबट, खारट पदार्थ, पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ, टोमॅटोच्या बिया, वांगी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी खाणे टाळावे.
- मांसाहार, अंडी यांचे मर्यादित सेवन करा.
- हिरव्या पालेभाज्यांचा जेवणात अधिक समावेश असावा,
- शहाळ्याचे पाणी, केळी, मनुका, कुळथाची आमटी आहारात असावी.
हे सुद्धा वाचा..
किडनी निकामी होण्याची कारणे, लक्षणे व उपचार
Read Marathi language article about Kidney stones Symptoms, Causes, Treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.