पुरुषांसाठी आवश्यक वैद्यकिय तपासण्या :
रोग उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच दक्ष राहणे केंव्हाही चांगले असते. यासाठी वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकिय तपासण्या करुन घेणे गरजेचे असते. नियमित तपासण्या केल्यामुळे अनेक गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. जस जसे वय वाढत जाते तसे शरीर अनेक रोगांना बळी पडू लागते. अनेक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होऊ लागतात. यासाठी दक्षता म्हणून नियमित तपासणींचा अवलंब करावा.
1) रक्तदाब तपासणी –
हृद्याच्या आरोग्यासाठी नियमित रक्तदाब तपासणी करुन घ्यावी. यांमुळे हृद्यरोग, धमनीकाठिन्य, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात यासारख्या गंभीर रोगांपासून सतर्क राहण्यास मदत मिळते.
2) ब्लड कोलेस्टेरॉल टेस्ट –
वर्षातून एकदा तरी कोलेस्टेरॉल चाचणी करुन घ्यावी. यांमुळे हृद्यरोग, धमनीकाठिन्य, उच्चरक्तदाब, पक्षाघात यासारख्या गंभीर रोगांपासून सतर्क राहण्यास मदत मिळते. धुम्रपान करणाऱयांनी नियमित कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घ्यावी.
3) ब्लड ग्लुकोज टेस्ट –
रक्तातील साखरेची तपासणी नियमित करावी. त्यामुळे मधुमेह आणि मधुमेहाच्या दुष्परिणामापासून रक्षण होण्यास मदत होते.
4) PSA तपासणी –
प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढत्या वयामुळे प्रोस्टेट वृद्धी, प्रोस्टेट कैन्सर होण्याची अधिक शक्यता असते यासाठी Prostate Specific Antigen (PSA test) नियमित वर्षातून एकदा करुन घ्यावी.
5) मलाशय परिक्षण –
प्रोस्टेट कैन्सर, मलाशयाचा कैन्सर होण्यापासून रक्षण होते. आतड्यातील रक्तस्त्रावाची माहिती मिळते.
6) डोळ्यांची तपासणी –
वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी. मधुमेह, उच्चरक्तदाब यासारखे विकार असणाऱयांसाठी डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
7) तोंड, घसा आणि दाताची तपासणी –
धुम्रपान, तंबाखु, पानसुपारी यांचे सेवन करणाऱयांनी नियमित तोंड, घसा आणि दाताची तपासणी करुन घ्यावी. कारण त्यांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.