हिरड्यातून रक्त येणे (Bleeding gums) –
काहीवेळा आपल्या हिरड्यातून रक्त येऊ लागते. हिरड्यातील इन्फेक्शनपासून ते दातांची मुळे सैल झाल्याने हा त्रास होत असतो. हिरडीतून रक्त येते तेंव्हा त्याठिकाणी दुखुही लागते.
हिरड्यातून रक्त का येते ..?
अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येते. तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांची मुळे सैल होणे, दात किडणे, ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव, पायरिया, गर्भावस्था अशा कारणांनी हिरड्यातून रक्त येऊ लागते.
हिरड्यातून रक्त येणे यावर घरगुती उपाय –
अर्धा चमचा मधात 2 थेंब लिंबू रस मिसळून मिश्रण तयार करावे. हिरड्यांतून रक्त येत असल्यास बोटाने हे मिश्रण तेथे लावावे. या उपायाने हिरडीतून येणारे रक्त थांबते.
पेरूची ताजी पाने चावत राहिल्याने हिरड्यांतून रक्त येणे थांबते. तसेच यामुळे हिरड्या मजबूत होण्यास देखील मदत होते.
मोहरीच्या तेलात हळद मिसळून मिश्रण तयार करावे. ह्या मिश्रणाने रोज रात्री झोपण्यापूर्वी हिरड्यांना मसाज करावा. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे थांबते व हिरड्या मजबूत होतात.
लवंग तेल कापसाच्या बोळ्याने हिरड्यांच्या ठिकाणी लावावे. यामुळे तेथील इन्फेक्शन व सूज कमी होऊन रक्त येणे थांबते.
हिरडीतून रक्त येऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- तोंडाची स्वच्छता ठेवावी.
- सकाळी व रात्री असे दोनवेळा दात घासावेत.
- चुकीच्या पद्धतीने व जास्त जोरात दात घासू नका. यामुळे हिरड्यांना जखम होऊ शकते.
- दात घासण्यासाठी मऊ ब्रिसल्स असणारा ब्रश वापरा.
- तोंड धुताना बोटाने हिरड्यांची मालिश करा.
- काहीही खाल्ल्यानंतर चूळ जरूर भरा.
- आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आवळा, लिंबूपाणी, संत्री, मोसंबी, केळी यासारख्या पदार्थांचा समावेश करा.
- मद्यपान, धूम्रपान, गुटखा, पानमसाला खाणे ताबडतोब बंद करा.
हे सुध्दा वाचा – हिरड्या बळकट करण्याचे उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Bleeding gums Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.