घशात जळजळ होणे (Throat burning) :
बऱ्याचदा आपल्या घशाची जळजळ होऊ लागते. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे पित्त व ऍसिडिटी वाढून हा त्रास होत असतो.
घशात जळजळ का होते ..?
आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये जळजळ होऊ लागते. यामुळे आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी सुटणे, मळमळ, डोकेदुखी असे अन्य त्रास यावेळी होऊ शकतात.
घशात जळजळ होण्याची कारणे –
- मसालेदार, तिखट, आंबट पदार्थ अधिक खाणे किंवा वारंवार चहा-कॉफी पिणे यामुळे घशात जळजळ होत असते.
- तसेच ऍसिडिटी, acid reflux, अल्सर यामुळे घशात जळजळ होते.
- तंबाखू, धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनांमुळे घशात जळजळ होते.
- डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या वरचेवर घेतल्यामुळे, पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून घशात जळजळ होत असते.
अशा अनेक कारणांनी घशामध्ये जळजळ होते.
घशात जळजळ होणे यावर घरगुती उपाय –
घशात जळजळ होत असल्यास केळे खावे. केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे घशात जळजळ होत असल्यास केळे खाल्याने आराम मिळतो. केळे खाण्याचे फायदे जाणून घ्या..
घशात जळजळ होत असल्यास थंड दूध प्यावे. यामुळे ऍसिडिटी कमी होऊन घशातील जळजळ थांबते. याशिवाय मनुका दुधात घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात.
घशाची जळजळ होत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे ऍसिडिटी व घशातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे घशात जळजळ होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.
घशामध्ये जळजळ होऊ नये यासाठी काय करावे ..?
- बराच वेळ उपाशी राहू नये. वेळेवर जेवावे.
- चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
- वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
- स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
- पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- नियमित व्यायाम करावा.
- मानसिक ताण घेऊ नये.
- रात्री जागरण करू नये. तसेच दिवसा झोपू नये.
- वारंवार वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे टाळावे.
अशी काळजी घेतल्यास घशात जळजळ होत नाही.
हे सुध्दा वाचा – घशात टोचणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about throat burning causes and home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 24, 2024.