Dr Satish Upalkar’s article about Bottle Gourd Health benefits in Marathi.
दुधी भोपळा – Bottle Gourd :
दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी दुधी भोपळा खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान याविषयी माहिती सांगितली आहे.
दुधी भोपळा ही फळभाजी असून याला हिंदीमध्ये ‘लौकी की सब्जी’ तर English मध्ये ‘बॉटल गार्ड’ (Bottle gourd) या नावाने ओळखले जाते. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा ही भाजी सर्व आजारांवर पथ्यकर (उपयुक्त) अशी सांगितली असून ती पित्त व कफ कमी करणारी व शरीराचे पोषण करून बल वाढवणारी असते.
दुधी भोपळा खाण्याचे फायदे :
दुधी भोपळा खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने हृदयासाठी हितकर असते. यात पोटॅशियम देखील मुबलक असते त्यामुळे रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो. यामुळे वजन आटोक्यात राहते. दुधी भोपळा हा डायबेटिस रुग्ण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी खूप उपयुक्त असतो. मूळव्याध समस्या कमी होण्यास मदत होते. हे फायदे दुधी भोपळ्याची भाजी खाल्याने होतात.
दुधी भोपळा आरोग्यासाठी कसा फायदेशीर असतो..?
1) वजन कमी करते..
दुधी भोपळ्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. कारण दुधी भोपळ्यात फायबरचे मुबलक प्रमाण असून त्यात कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे भूक कमी होते, ज्यामुळे आपले वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप पिणे फायदेशीर असते.
2) हृदयासाठी उपयुक्त..
दुधी भोपळा खाण्यामुळे आपल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइड्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल आटोक्यात राहिल्याने हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात यासारखे गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते. तसेच यात पोटॅशियमचे प्रमाणही मुबलक असल्याने ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो. पर्यायाने हृदय निरोगी ठेवण्यासाठी दुधी भोपळा उपयोगी असतो.
3) मधुमेहामध्ये फायदेशीर..
दुधी भोपळ्यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय दुधी भोपळा इन्सुलिन वाढविण्यासही मदत करतो. अशाप्रकारे दुधी भोपळा मधुमेहामध्ये उपयुक्त ठरतो.
4) मुळव्याधमध्ये उपयुक्त..
दुधी भोपळ्यामधील फायबर (तंतुमय पदार्थ) बद्धकोष्ठता आणि मूळव्याधाच्या समस्येवर उपयुक्त ठरतो. त्यामुळे मुळव्याधमध्ये पोट साफ न होण्याचा त्रास असल्यास आहारात दुधी भोपळ्याच्या भाजीचा जरूर समावेश करा. मुळव्याधविषयी माहिती व उपचार जाणून घ्या..
5) कॅन्सरचा धोका कमी करतो..
कर्करोगापासूनही आपल्याला दूर ठेवण्यास दुधी भोपळा उपयुक्त ठरतो. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की दुधी भोपळ्यात केमोप्रिव्हेंटिव्ह गुणधर्म असतात त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
6) गरोदरपणात उपयुक्त..
दुधी भोपळ्याची भाजी ही पौष्टिक असल्याने गरोदरपणात आहारात जरुर असावी. यामुळे गरोदर स्त्रीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही योग्यरीत्या होते. याशिवाय या भाजीत असणाऱ्या फायबर्समुळे प्रेग्नन्सीत वारंवार होणारा बद्धकोष्ठतेचा त्रासही दूर होण्यास मदत होते.
दुधी भोपळ्यात अनेक उपयोगी पोषकतत्वे असतात. त्यामुळे आपल्या आहारात दुधी भोपळ्याची भाजी जरुर समाविष्ट करावी. दुधीची भाजी खाण्यास आवडत नसल्यास दुधी भोपळ्याचे कोशिंबीर, सूप, हलवा, थालीपीठ किंवा पराठा असे दुधी भोपळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ खाऊ शकता.
दुधी भोपळा खाण्याचे तोटे व नुकसान :
आरोग्यासाठी दुधी भोपळ्याचे फायदे बरेच आहेत, त्याचप्रकारे यामुळे काही तोटेही होऊ शकतात, ते खालीलप्रमाणे आहेत.
- दुधी भोपळा नेहमी ताजा व कोवळा असताना खाण्यासाठी वापरणे गरजेचे असते. जास्त जुन झालेला दुधी भोपळा खाल्यास पोटदुखी, अतिसार हे त्रास होऊन पोट बिघडू शकते.
- दुधी भोपळा नेहमी उकडून किंवा शिजवून खाणे आवश्यक असते. दुधी भोपळा कच्चा खाण्यामुळेही पोट बिघडू शकते.
- जर दुधी भोपळा चविस कडू असल्यास तो खाऊ नका, कारण असा दुधी भोपळा शरीराला अपायकारक ठरू शकतो.
- कडू रसांचा दुधी भोपळा प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नये. कारण असा दुधी भोपळा गर्भवतीसाठी हानिकारक ठरू शकतो.
दुधी भोपळ्यातील पोषकघटक (Nutrition Facts) :
116 ग्रॅम दूधी भोपळ्यात खालील पोषकघटक असतात.
- कॅलरी – 16
- कर्बोदके – 4 ग्रॅम
- कोलेस्टेरॉल – 0 ग्रॅम
- व्हिटॅमिन ए -2 युनिट
- व्हिटॅमिन बी1 – 0.02 मिग्रॅ
- व्हिटॅमिन बी2 – 0.03 मिग्रॅ
- व्हिटॅमिन बी3 – 0.35 मिग्रॅ
- व्हिटॅमिन सी – 12 मिग्रॅ
- सोडियम – 1 मिग्रॅ
- पोटॅशियम – 101 मिग्रॅ
- कॅल्शियम – 30 मिग्रॅ
- लोह – 0.23 मिलीग्राम
- फॉस्फरस – 15 मिग्रॅ
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
कोहळा खाण्याचे फायदे जाणून घ्या..
In this article information about Bottle Gourd Health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).