लहान मुलांचा आहार :
आपले मूल पुरेसे खात नाही किंवा मुलाला फक्त बाहेरचे चमचमीत पदार्थ खायला आवडते, अशी बहुतेक पालकांची मुलांच्या आहारासंदर्भात तक्रार असते. अशावेळी मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मुलांच्या योग्य पोषण व वाढीसाठी कोणता आहार द्यावा, लहान मुलांचा आहार कसा असावा, त्याच्या आहारात काय समाविष्ट करावे याची माहिती येथे दिली आहे.
मुलांना काय खायला द्यावे?
लहान वयात शरीर विकसित होत असते. म्हणूनच, या वाढत्या वयात मुलाच्या आहारात दूध व दुधाचे पदार्थ, हिरव्या भाज्या, फळे, धान्ये व कडधान्ये, सूखामेवा, अंडी, मांस, मासे, चिकन यांचा समावेश असावा. यामुळे शरीराला कर्बोदके, प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ, व्हिटॅमिन, खनिज व क्षारघटक मिळतात.
हिरव्या पालेभाज्या मुलाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण त्यातून आवश्यक जीवनसत्त्वे, लोहासारखी खनिजे व फायबर्स शरीराला मिळतात. दूध, दही, लोणी, तूप, चीज इत्यादी डेअरी प्रोडक्ट कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे मुलांच्या शरीराची हाडे मजबूत बनण्यास मदत होते. तर कडधान्ये, सूखामेवा, अंडी, मांस, मासे, चिकन यांमुळे शरीराला प्रोटीन्स मिळते. त्यामुळे मांसपेशी मजबूत होतात.
मुलांना काय खायला देऊ नये?
वारंवार बाहेरच्या चमचमीत पदार्थांची सवय मुलांना लावू नये. मुलांना फास्टफूड, जंक फूड, तेलकट पदार्थ, गोड साखरेचे पदार्थ, चरबीचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट जास्त प्रमाणात खायला देऊ नयेत. चॉकलेट्स, केक यांचा समावेशही कमी असावा. मुलांना चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स प्यायला देऊ नये.
लहान बाळाचा आहार –
लहान बाळासाठी पहिले सहा महिने केवळ आईचे दूध हाच सर्वोत्तम आहार असतो. त्यामुळे बाळाचे पोषण होते तसेच संसर्गापासूनही रक्षण होते. पहिले सहा महिने आईने दिवसातून कमीतकमी आठ ते दहा वेळा आपल्या बाळाला स्तनपान द्यावे.
सहा महिने ते दोन वर्षाच्या बाळाचा आहार –
या वयातील बाळाला आईच्या दुधाबरोबरच अर्ध-घन आहार दिला पाहिजे. यावेळी खीर, मऊ भात, वरण, फळांचा मऊ गर, उकडलेले बटाटे, उकडलेले मऊ मांस, अंडी, अंड्यातील पिवळ बलक इत्यादींचा समावेश करू शकता.
तीन ते चार वयातील लहान मुलांसाठी पोषक आहार –
या वयात मुलांना दररोज 1300 कॅलरी आहार दिला पाहिजे. त्यांच्या आहारात वरणभात, तूप-रोटी, उपमा, खीर, खिचडी, ताजी फळे, दूध, अंडी, मांस इत्यादींचा समावेश असावा.
5 ते 9 वर्षे लहान मुलांचा पौष्टिक आहार –
पाच ते नऊ या वयोगटातील म्हणजे प्राथमिक शाळेतील मुलांना 1200 ते 1700 कॅलरीज आहार दिला पाहिजे. यासाठी रोज ग्लासभर दूध, भात, भाजी, भाकरी किंवा पोळी, डाळ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, सुखामेवा, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, चिकन यांचा समावेश करावा.
10 ते 15 वर्षाच्या मुलांसाठी पोषक आहार –
दहा ते पंधरा या वयोगटातील म्हणजे माध्यमिक शाळेतील मुलासाठी 1700 ते 2500 कॅलरीज आहार दिला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, भात, भाकरी किंवा पोळी, डाळ, सुखामेवा, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, चिकन यांचा समावेश करावा. या वयातील मुलांना जंकफूड आवडते. पण त्याने वजन वाढते, हार्मोन्समध्ये बदल होतात, मुलांना टाइप टू मधुमेह होऊ शकतो. यासाठी फास्टफूड, जंक फूड खाणे टाळले पाहिजे.
Read Marathi language article about Diet plan For Children.