सर्व्हिकल सर्कलेज (Cervical cerclage) :
काहीवेळा गरोदर स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ व्यवस्थित वाढत असतो; मात्र पिशवीचे तोंड कमकुवत असते. अशा गर्भवती महिलांमध्ये पिशवीचे तोंड हे अगदी सोळा ते अठरा आठवड्यांचा गर्भसुद्धा पेलू शकत नाही. त्यामुळे अचानकपणे तोंड पूर्णपणे उघडते व गर्भपात (अबॉर्शन) होत असतो.
या स्थितीला ‘सर्वाइकल इनकॉम्पीटेंस’ असे म्हणतात. यामध्ये स्त्रीचे गर्भाशयाचे तोंड (सर्विक्स) हे अतिशय कमजोर असते. गर्भावस्थेत सोनोग्राफी तपासणीमध्ये याचे निदान होऊ शकते. याशिवाय ज्या मातांना जुळे असेल त्यांच्यात ही समस्या होऊ शकते.
यावर उपचार म्हणून गरोदरपणात पिशवीच्या तोंडाला टाका घालण्याची शस्त्रक्रिया केली जाते. याला सर्वाइकल स्टिच किंवा सर्व्हिकल सर्कलेज (Cervical cerclage) असे म्हणतात. या शस्त्रक्रियेनंतर गर्भाशयाचे तोंड हे वाढणाऱ्या बाळाचे वजन योग्यरीत्या पेलू शकते. त्यामुळे गरोदरपण व्यवस्थित पार जाते.
गर्भपिशवीच्या तोंडाला घातलेले टाके मात्र शेवटच्या महिन्यात, प्रसुतीच्या नियोजित तारखेच्या 15 दिवस आधी काढावे लागतात. अन्यथा डिलिव्हरीत जोखमीची स्थिती निर्माण होत असते.
गरोदरपणात गर्भपिशवीच्या तोंडाला टाके घातल्यास अशी घ्यावी काळजी :
प्रेग्नन्सीमध्ये जर गर्भाशयाचे तोंड कमजोर असल्यास तेथे टाके घातले गेल्यास गरोदर स्त्रीची विशेष काळजी घ्यावी लागते.
• कष्टाची कामे, धावपळ करणे टाळावे.
• पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असते.
• डॉक्टरांच्या सुचनेशिवाय व्यायाम करू नये.
• लैंगिक संबंध करणे टाळावेत.
Read Marathi language article about Cervical cerclage. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.