प्रेग्नन्सीमध्ये प्री-एक्लेम्पसिया (Preeclampsia) होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

प्री-एक्लेम्पसिया म्हणजे काय (Preeclampsia) :

काही स्त्रियांना गरोदरपणात ‘प्री-एक्लेम्पसिया’चा त्रास होत असतो. गरोदरपणात पायांवर, हातांवर, चेहऱ्यावर खूप सूज येणे व ब्लडप्रेशर खूप वाढलेले असल्यास ‘प्री-एक्लेमप्सिया’ ही गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. ही एक गंभीर स्थिती असून यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यास धोका असतो. यासाठी ‘प्री-एक्लेमप्सिया’वर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक असते.

गर्भावस्थेत प्री-एक्लेम्पसिया होण्याची कारणे :

गर्भावस्थेत अपरा (प्लेसेंटा) जेंव्हा योग्यरीत्या काम करीत नाही तेंव्हा ही स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे प्लेसेंटातील रक्तप्रवाह कमी होतो. पर्यायाने गर्भाशयातील बाळास पुरेशा प्रमाणात पोषकघटक आणि ऑक्सिजन मिळत नाही. अशाप्रकारे प्रीक्लेम्पसिया यामुळे बाळाला धोका निर्माण होतो.

ज्या स्त्रियांच्या फॅमिलीमध्ये विशेषत: आईला जर ‘प्री-एक्लेमप्सिया’ झालेला असेल, त्यांच्यात याचे प्रमाण जास्त असते. भारतात साधारण 10% स्त्रियांमध्ये ही स्थिती निर्माण होऊ शकते.

गरोदरपणात ‘प्री-एक्लेम्पसिया’ची लक्षणे :

• हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे,
• वजनात अवाजवी वाढ होणे,
• ब्लडप्रेशर वाढलेले आढळते,
• लघवीमध्ये अलबुमीन (प्रोटीनचा प्रकार) आढळून येतो,
• युरिनमध्ये प्रोटिन्स आढळतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

काही महिलांमध्ये डोके दुखू लागते, जळजळ वाढू लागते, अस्वस्थता वाढते, डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागतात. ही सर्व लक्षणे हा आजार जास्त तीव्र स्वरूप धारण करतोय हे दर्शवितात.

प्री-एक्लेमप्सियाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या व लघवीची तपासणी केली जाते. या अवस्थेमध्ये वरचेवर डॉक्टरांकडे ब्लडप्रेशर व लघवीची तपासणी करून आजाराची तीव्रता तपासली जाते. व्यवस्थित काळजी न घेतल्यास याची तीव्रता वाढते व झटके येऊ शकतात. त्या स्थितीस ‘एक्लेमप्सिया’ म्हणतात. ही स्थिती अर्थातच खूप गंभीर असते. यामध्ये बाळ दगावण्याची शक्यता असते तसेच उपचार वेळेवर न झाल्यास गरोदर मातेच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते.

प्री-एक्लेम्पसिया आणि उपचार :

ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे ही महत्त्वाची उपचार पद्धती असते. याशिवाय विश्रांती हेसुद्धा खूप महत्त्वाचे असते. ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यासाठी गोळ्यांचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या परवानगी किंवा सल्ल्याशिवाय गोळीत बदल करू नये. याशिवाय आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.