सिझेरियन डिलिव्हरी :
नैसर्गिक प्रसुती होणे अवघड असल्यास पोटावर ऑपरेशन करून बाळ बाहेर काढण्यात येते. या ऑपरेशनला ‘सिझेरियन डिलिव्हरी‘ (c-section delivery) असे म्हणतात. त्यानंतर छेद दिलेल्या ठिकाणी टाके घातले जातात.
सिझेरियन ऑपरेशनच्यावेळी भुलीचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे पोटावर छेद देताना फार वेदना जाणवत नाहीत. मात्र भूल उतरल्यावर टाके घातलेल्या ठिकाणी वेदना जाणवू लागतात. अशावेळी वेदना कमी करण्यासाठी आपले डॉक्टर वेदनाशामक औषधे देत असतात.
सिझेरियन बाळंतपणानंतर दवाखान्यात घेतली जाणारी काळजी :
- नॉर्मल डिलिव्हरीप्रमाणेच सिझेरियननंतर योनीतून गर्भाशयातील रक्तस्त्राव येत असतो. अशावेळी आपल्याला सॅनिटरी पॅड वापरण्याची आवश्यकता असते.
- थोडी सैल आणि सूती अंडरवियर वापरा. यामुळे आपणास आरामदायक वाटू लागेल.
- जेव्हा जेव्हा आपल्याला भूक किंवा तहान लागेल तेव्हा लगेच काहीतरी खावे किंवा प्यावे.
- बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पर्याप्त प्रमाणात द्रवपदार्थ प्यावेत आणि फायबरयुक्त आहार घ्यावा.
- ऑपरेशननंतर दवाखान्यात 24 तासांनी हळूहळू चालण्यास सांगितले जाते.
- ऑपरेशननंतर तीन दिवसांनी टाके घातलेल्या ठिकाणचे ड्रेसिंग बदलले जाईल आणि जखमेची तपासणी केली जाईल. पाचव्या दिवशी ड्रेसिंग पट्टी काढून टाकले जाईल.
- आज अनेक हॉस्पिटलमध्ये सबक्यूटिक्यूलर टाके घातले जातात. यामुळे जखम लवकर बरी होते तसेच टाके काढून टाकावे लागत नाहीत.
सिझेरियन झाल्यानंतर घरी कधी जाऊ शकाल..?
सबक्यूटिक्यूलर टाके असल्यास ऑपरेशननंतर हॉस्पिटलमध्ये तीन ते पाच दिवस राहावे लागू शकते. तर काढून टाकावे लागणारे टाके घातले असल्यास जखम बरी झाल्यानंतर आपले डॉक्टर बाळंतपणानंतर सहा ते सात दिवसात घातलेले टाके काढून टाकतात. त्यानंतर टाक्यांची स्थिती व्यवस्थित आहे ते पाहून घरी सोडले जाईल. तसेच काही दिवसांनी पुन्हा तपासणीसाठी बोलावले जाते.
सिझेरियन प्रसूतीनंतर घरी आल्यावर अशी घ्यावी काळजी :
- घरी आल्यानंतर काही दिवस सिझरच्या टाक्यांची काळजी घेणे आवश्यक असते. अंघोळ करताना त्याठिकाणी हळुवार साबण लावून टाके घातलेली जागा स्वच्छ करावी. त्यानंतर मऊ व स्वच्छ वाळलेल्या टॉवेलने हलकेच पुसून घ्यावी. त्यानंतर त्यावर डॉक्टरांनी दिलेली एंटीसेप्टिक पाउडर किंवा क्रीम लावावी.
- टाके घातलेल्या ठिकाणी लक्ष ठेवावे. तेथे तीव्र वेदना, लालसरपणा किंवा त्यातून स्त्राव होणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे.
- प्रसूतीनंतरची मालिश करून घेताना या टाक्यांची काळजी घ्यावी. याठिकाणी मालिश करू नये.
- सुरवातीचे काही आठवडे जास्त कष्टाची कामे करणे, जड वस्तू उचलणे, पायऱ्या चढणे उतरणे टाळावे. सिझेरियन ऑपरेशननंतर शरीर पूर्वपदावर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
- हलका व्यायाम करावा, चालणे फिरणे सुरू ठेवावे, घरातील सोपी कामे करावीत.
सिझेरियन झाल्यानंतर काय खावे..?
सिझर झाल्यावर पौष्टिक आहार घ्यावा. जेव्हा आपल्याला भूक किंवा तहान लागेल तेव्हा लगेच काहीतरी खावे किंवा प्यावे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पर्याप्त प्रमाणात द्रवपदार्थ प्यावेत आणि फायबरयुक्त आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, डाळी, धान्ये, सुकामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी असे पदार्थ खावेत. बाहेरील उघड्यावरील दूषित पदार्थ, दूषित पाणी पिणे टाळावे. हे सुध्दा वाचा – बाळंतपणातील आहार कसा असावा ते जाणून घ्या..
सिझेरियन बाळंतपणानंतर व्यायाम :
सिझेरियन डिलिव्हरीमध्ये पोटावर टाके पडलेले असतात. त्यामुळे काही दिवस जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सिझेरियननंतर व्यायाम करतानाही योग्य ती खबरदारी ठेवावी लागते. व्यायामाने पोटावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अशावेळी आपण हलका व्यायाम करू शकता. यासाठी चालण्याचा व्यायाम उपयोगी असतो. बाळंतपणात व्यायाम कधी व कसा करावा ते जाणून घ्या..
सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर संबंध :
सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास पोटावरील टाक्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सिझर झाल्यास साधारण दीड ते दोन महिन्यानंतर संबंध सुरू करु शकता. डिलिव्हरीनंतर संबंध कधी सुरू करावे ते जाणून घ्या..
Read Marathi language article about Care tips after Cesarean Delivery. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.