Article about Burns first aid in Marathi.

भाजणे यावरील प्राथमिक उपाय –

आग, उष्णता, गरम पाणी, इलेक्ट्रिक शॉक, सूर्यकिरण, केमिकल अशा अनेक कारणांनी त्वचा भाजू शकते. कमी प्रमाणात भाजले असल्यास घरगुती प्राथमिक उपाय पुरेसे असतात मात्र जर अधिक प्रमाणात भाजले असल्यास वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.

भाजणे यावरील घरगुती प्राथमिक उपाय

त्वचा किती प्रमाणात भाजली आहे त्याचे स्वरूप पाहून तीन विभागात वर्गीकरण करतात.

1) फर्स्ट डिग्री बर्न –

यामध्ये भाजल्यामुळे त्वचेचा वरचा भाग लाल होतो आणि त्याठिकाणी खूप वेदना होत असते. काहीवेळा थोडीशी सूजसुध्दा येते. जळलेली त्वचा 1-2 दिवसात निघून जाते. जखम 3-6 दिवसात बरे होते.

फर्स्ट डिग्री बर्नवरील प्राथमिक उपाय –

 • भाजलेल्या भागाला 5 मिनिटे पाण्यात बुडवून थंड करावे किंवा भाजलेल्या ठिकाणी थंड पाणी शिंपडावे. यामुळे तेथील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
 • भाजलेल्या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीम किंवा बर्नोल क्रीम लावावे.
 • भाजलेल्या ठिकाणी वेदना अधिक होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळी घ्यावी.

2) सेकंड डिग्री बर्न –

यामध्ये त्वचा थोडी जास्त जळलेली असते. यात खूप वेदना होतात तसेच भाजलेल्या ठिकाणी फोड येतात. यामध्येही त्वचा खूपच लाल रंगाची व सूज युक्त होते. यामध्ये भाजलेली जखम बरी होण्यास 2-3 आठवडे लागतात.

सेकंड डिग्री बर्नवरील प्राथमिक उपाय –

 • भाजलेल्या भागाला 15 मिनिटे पाण्यात बुडवून थंड करावे किंवा भाजलेल्या ठिकाणी थंड पाणी शिंपडावे. यामुळे तेथील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
 • भाजलेल्या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीम लावावे.
 • जखम बरी होईपर्यंत रोजच्यारोज भाजलेल्या ठिकाणी अँटीबायोटिक क्रीम लावावे.
 • भाजलेल्या ठिकाणी वेदना अधिक होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या सल्ल्याने वेदनाशामक व अँटीबायोटिक औषधे घ्यावीत.

3) थर्ड डिग्री बर्न –

यामध्ये त्वचेचे तीनही थर जळतात. यामध्ये, जळलेली त्वचा ही पांढरी होते. त्वचा अधिक प्रमाणात जळल्यामुळे त्वचेतील न्यूरॉनचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेदना कमी जाणवत असतात. ह्या प्रकारची भाजलेली जखम बरी होण्यास बराच काळ लागतो.

थर्ड डिग्री बर्नवरील प्राथमिक उपाय –

 • आवश्यकता असल्यास त्या व्यक्तीस आग इत्यादींपासून दूर करावे.
 • थर्ड डिग्री बर्नमध्ये रूग्णाला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात घेऊन जावे किंवा तातडीने 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
 • भाजलेल्या व्यक्तीच्या शरीरावर किंवा कपड्यांना स्पर्श करु नका कारण ते जखमेवर चिकटू शकतात.
 • जखमेवर पाणी घालू नका.
 • कोणत्याही प्रकारचे मलम लावू नका.
 • रुग्णाची श्वसनक्रिया योग्यप्रकारे होत आहे का याकडे लक्ष द्यावे. जर श्वसनक्रिया बंद पडलेली असल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा.

हे सुध्दा वाचा..
प्रथमोपचार पेटीमध्ये कोणते साहित्य असावे याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कॉपीराइट - डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)