अंगदुखी – Body pain :

अंगदुखी ही एक सामान्य समस्या आहे. थकवा, आजारपण किंवा व्यायामामुळे अंगदुखी होऊ शकते, याच्या कारणांवरून त्यावर उपाय ठरतात. थकव्यामुळे अंग दुखत असल्यास थोडी विश्रांती घेतल्यास बरे वाटते. तर काहीवेळा यासाठी वेदनाशामक औषधे घ्यावी लागतात.

अंगदुखीची लक्षणे (symptoms) :

अंगदुखीमध्ये साधारणपणे पुढील लक्षणे जाणवतात.

  • अंग दुखू लागणे,
  • शरीराच्या विशिष्ट भागात वेदना जाणवणे,
  • अशक्तपणा व थकवा,
  • ताप, सर्दी आणि फ्लू सारखी लक्षणे जाणवणे, ही लक्षणे अंगदुखीमध्ये जाणवतात.

अंगदुखीची कारणे (Causes of body pain) :

  • जास्त शारीरिक श्रम,
  • जास्त व्यायाम किंवा अधिकच्या प्रवास,
  • ताप, सर्दी आणि फ्लू सारखे इन्फेक्शन,
  • मानसिक ताण,
  • अपुरी झोप,
  • सांधेदुखी, आमावात, गाऊट सारख्या त्रासामुळे,
  • मूत्र मार्गातील संसर्ग,
  • किडनीचे आजार, थायरॉईड प्रॉब्लेम, यकृत सिरॉसिस यामुळे,
  • काही औषधांमुळे (जसे ब्लडप्रेशर वरील औषधे)
  • फाइब्रोमायोजिया (Fibromyalgia),
  • मल्टिपल स्क्लेरोसीस (Multiple sclerosis)
  • रक्तातील पोटॅशियमच्या कमतरतेमुळे,
  • व्हिटॅमिन-डी ची कमतरता,
  • डिहायड्रेशन किंवा पाणी कमी पिण्याची सवय, अशा अनेक कारणांनी अंगदुखी होऊ शकते.

अंगदुखीची गोळी व औषध उपचार –

अंगदुखी नेमक्या कोणत्या कारणांमुळे होत आहे त्यानुसार उपचार केले जातात. अंगदुखीवर आपले डॉक्टर paracetamol, diclofenac असे घटक असणारी वेदनाशामक गोळी औषधे देतील. तसेच काही काळ विश्रांती घेण्याची सूचनाही आपले डॉक्टर देतील.

अंगदुखीवरील घरगुती उपाय :

आले –

अंगदुखी दूर करण्यासाठी आले खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी व फायटोकेमिकल्स असे घटक असतात. एक कप पाण्यात चमचाभर मध आणि थोडे आले घालून हे मिश्रण उकळावे. मिश्रण उकळल्यानंतर ते गाळून घेऊन प्यावे. यामुळे अंगदुखी कमी होण्यास मदत होते.

दालचिनी –

दालचिनीतील एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे अंगदुखीपासून त्वरित आराम मिळण्यास मदत होते. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा दालचिनी मिसळून ते मिश्रण प्यावे.

हळद –

हळदीमध्ये सूज व वेदना कमी करणारे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे गरम दुधात 1 चमचा हळद मिसळून ते दूध प्यावे. अंगदुखी असल्यास हा उपाय उपयुक्त ठरतो.

अंगदुखी कमी करण्यासाठी काय करावे?

  • अतिश्रम, व्यायाम यामुळे थकवा येऊन अंग दुखत असल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी.
  • गरम पाण्याने अंघोळ केल्यानेही अंगदुखी दूर होण्यास मदत होते.
  • अपुरी झोप, प्रवास, ताणतणाव यामुळे अंग दुखत असल्यास त्यावेळीही पुरेशी विश्रांती घ्यावी.
  • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते व अंग दुखत नाही.
  • व्हिटॅमिन-डी, कॅल्शिअम यांच्या कमतरतेमुळे अंग दुखत असल्यास आहारात दूध, अंडी, मांस, सुकामेवा यांचा समावेश करावा. सकाळी कोवळ्या उन्हात थोडावेळ बसावे.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?

  • घरगुती उपाय करूनही वेदना कमी होत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडे जावे,
  • अंगदुखी बरोबरच अंगावर सूज आल्यास किंवा अधिक वेदना जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
  • अंगदुखी बरोबरच ताप आल्यास, चक्कर येत असल्यास किंवा त्वचेवर पुरळ आल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

Read Marathi language article about Body pain causes, treatment & Home remedies. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.