बाळाची शी :
जन्म झाल्यानंतर बाळाची मलत्याग करण्याची क्रिया सुरू होते. बाळाचे वय जसजसे वाढत जाईल तसे बाळाच्या शी मध्ये बदल झालेला आढळतो. विशेषतः शीच्या रंगाच्या बाबतीत अनेक बदल होत असतात. प्रामुख्याने बाळाच्या आहारमधील बदलांमुळे असे घडत असते. नवजात बाळ हे त्याच्या वयानुसार, घेत असलेल्या आहारानुसार वेगवेगळ्या रंगाची शी करत असते. अनेकदा काही पालक हे बाळाच्या शीचा रंग बदलल्यामुळे घाबरून जाऊ शकतात. यासाठी येथे बाळाच्या शीच्या बाबतीत कोणत्या गोष्टी नॉर्मल आहेत व कधी काळजी घ्यावी लागते याविषयी माहिती दिली आहे.
बाळ कितीवेळा शी करू शकते..?
साधारणपणे जन्मानंतर पहिल्या आठवड्यात, बाळ हे दिवसातून चार ते पाच वेळा शी करू शकते. त्यानंतर बाळाचा वयानुसार विकास होत असताना, त्याच्या शीचे प्रमाण प्रत्येक दिवसानुसार बदलू शकते.
• पहिल्या आठवड्यात – दररोज 4 ते 5 वेळा बाळ शी करू शकते.
• पहिल्या आठ ते 28 दिवसापर्यंत – दररोज 2 ते 3 वेळा बाळ शी करू शकते.
• एक महिना ते 12 महिन्यांमध्ये – दररोज 1 ते 2 वेळा बाळ शी करू शकते.
• एक वर्षांपासून पुढे – दररोज 1 वेळा बाळ शी करू शकते.
बाळाच्या शीचा रंग आणि त्याची कारणे :
नवजात बाळाला काळ्या रंगाची शी होणे –
बाळ जन्मानंतर जेंव्हा पहिल्यांदा शी करते तेव्हा ते काळ्या रंगाचे असते. या स्टूलला ‘मेकोनियम’ म्हणतात. ही एक नॉर्मल बाब असते. साधारण दोन ते तीन दिवसानंतर हळूहळू बाळाच्या शीचा रंग बदलत जातो.
साधारणपणे जन्माच्या चौथ्या दिवसापासून बाळाच्या शीचा रंग पिवळा, फिकट हिरवा किंवा फिकट गुलाबी दिसू लागतो. अशाप्रकारे बाळास शी होत असल्यास बाळ निरोगी व सामान्य असल्याचे सूचित होते. मात्र जर चार-पाच दिवस होऊनही जर नवजात बाळ काळी शी करीत असल्यास ते काळजीचे कारण असू शकते.
नवजात बाळाला केशरी रंगाची शी होणे –
जर बाळाने केशरी रंगाची शी केल्यास ते कावीळचे लक्षण असू शकते. विशेषतः आईचे दूध न पिणाऱ्या व पावडरचे फॉर्म्युला दूध पिणार्या बाळांमध्ये कावीळची शक्यता जास्त असू शकते. जर अशी शी झाली तर बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.
बाळाला पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची शी होणे –
बाळाला पिवळ्या आणि काहीवेळा हिरव्या रंगाची देखील शी होऊ शकते. हे अगदी सामान्य आहे. विशेषतः पाहिले सहा महिने बाळ हे दुधाशिवाय इतर काहीही खात किंवा पीत नाहीत, अशावेळी बाळास पिवळी किंवा फिकट हिरव्या रंगाची शी होऊ शकते. तसेच फॉर्मुला दूध पिणाऱ्या बाळांमध्ये गडद हिरवी शी होण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळीही काळजीचे कारण नसते.
बाळाला पांढऱ्या रंगाची शी होणे –
बाळास पचनासंबंधित काही समस्या असल्यास पांढऱ्या रंगाची संडास होऊ शकते. त्यामुळे जर बाळ पांढऱ्या रंगाची शी करीत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू न करता बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
बाळाला लाल रंगाची शी होणे –
जर बाळाला लालसर रंगाचे मल येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्तामुळे शौचाचा रंग लाल होऊ शकतो. याबरोबरच बाळास जुलाब किंवा सतत उलट्या होणे अशी लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशी शी झाली तर बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.
बाळाला राखाडी रंगाची शी होणे –
बाळाला राखाडी किंवा ग्रे कलरची शी होत असल्यास त्याकडेही दुर्लक्ष करू नये. बाळाला यकृत, पित्ताशय किंवा स्वादुपिंड या अवयवांसंबंधित समस्या असू शकते. अशावेळी बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?
• बाळाला दिवसभरात अधिकवेळा पातळ जुलाब होत असल्यास,
• बाळाच्या शी मधून रक्त पडत असल्यास,
• बाळास बद्धकोष्ठता असल्यास किंवा शी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.
Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.