अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि गरोदरपण –
अल्ट्रासाउंड सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरी पोटावरुन गर्भाशयापर्यंत पाठवली जातात. त्यानंतर ही ध्वनिलहरी गर्भापर्यंत पोहचून परत येतात आणि त्याद्वारे कॉम्प्युटरवर गर्भाशयातील गर्भाची स्थिती, हालचाल याविषयी चित्र दिसू लागतात. गरोदरपणात अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केल्याने बाळावर काही दुष्परिणाम होतील का, असे विविध प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असतात. यासाठी त्या सर्व शंकांचे निरसन या लेखात केले आहे.
गरोदरपणात सोनोग्राफीचा वापर करावा का..?
गरोदरपणातील तपासणीमध्ये सोनोग्राफीचा वापर करणे खूप आवश्यक असते. गर्भधारणा झाली आहे की नाही, झाल्यास गर्भाशयातच गर्भधारणा झाली आहे की इतर ठिकाणी झाली आहे, गर्भाची वाढ कशी होत आहे, गर्भाची हालचाल व स्थिती कशी आहे, जुळी बालके होणार आहेत का, गर्भात काही जन्मजात दोष आहेत का, नाळेचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही, गर्भजलाचे प्रमाण कसे आहे अशी अत्यंत महत्वाची माहिती सोनोग्राफी तपासणीतून डॉक्टरांना होत असते. त्यावरून योग्य ते उपचार ठरविण्यास मदत होत असते. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करणे गरजेचे असते. गरोदरपणात साधारणपणे चार ते पाच वेळा सोनोग्राफी केली जाऊ शकते.
अल्ट्रासाउंड सोनोग्राफी स्कॅनमध्ये उच्च फ्रीक्वेंसीचे ध्वनि तरंग पोटावरुन गर्भाशयापर्यंत पाठवली जातात. त्यानंतर ही तरंगे गर्भापर्यंत पोहचून परत येतात आणि त्याद्वारे कम्प्यूटरवर गर्भाशयातील गर्भाची स्थिती, हालचाल याविषयी चित्र दिसू लागतात. अल्ट्रासाउंड स्कॅनचा वापर केवळ वैद्यकीय कारणांसाठीच होणे आवश्यक असते. याचा वापर गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी करू नये. भारतात अल्ट्रासाउंड स्कॅनचा वापर करून गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे.
गरोदरपणात अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करणे सुरक्षित असते का..?
अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञान हे 40 पेक्षा जास्त वर्षांपासून गरोदरपणात तपासणीसाठी वापरले जात आहे आणि याचे आतापर्यंत कोणतेही दुष्परिणाम नोंदवले गेले नाहीत. यामध्ये ध्वनिलहरींचा वापर केला जातो.
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीतून कोणत्याही प्रकारची रेडिएशन्स तयार होत नाहीत. त्यामुळे अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी पूर्णपणे सुरक्षित असून याचा कोणताही विपरीत परिणाम आपल्या गर्भावर, होणाऱ्या बळावर किंवा गर्भवती स्त्रीवर होत नाही.
हे सुद्धा वाचा – गरोदरपणात सोनोग्राफी कधी करावी लागते ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Ultrasound sonography Scans during Pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.