गरोदरपणातील रक्ताल्पता (Anemia in Pregnant women) :
अॅनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन हे लाल पेशीमधील महत्वाचा भाग असते. या पेशींच्याद्वारे ऑक्सिजन शरीरभर पुरविला जातो. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास शरीरास ऑक्सिजन कमी मिळतो आणि पुढील अनेक समस्या निर्माण होतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्न म्हणजे लोहाची गरज असते.
गर्भावस्थेत हिमोग्लोबिन कमी होणे :
गर्भाशयात असणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळणे आवश्यक असते. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असल्यास बाळास पर्याप्त मात्रेत ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात स्त्रीला जाणवणारा थकवाही यामुळे कमी होण्यास मदत होत असते. अशाप्रकारे गरोदरपणात हिमोग्लोबिन महत्त्वाचे असते.
अनेमियाचे अनेक प्रकार असतात. गरोदरपणामध्ये साधारणपणे दिसून येणारे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
1) आयर्न डेफिसिएन्सी अॅनिमिया
2) फोलेट डेफिसिएन्सी अॅनिमिया
3) व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अॅनिमिया
आयर्न डेफिसिएन्सी –
यामध्ये लोहाची कमतरता हे मुख्य कारण असते. गरोदरपणात लोहयुक्त आहार नसेल तर हा होतो. प्रेग्नन्सीमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होण्याचे प्रमाण जास्त आहे.
फोलेट डेफिसिएन्सी –
यातही आहारातील कमतरता हेच कारण असते. शाकाहारी पदार्थांमध्ये फोलेट खूप कमी असते. त्यामुळे लाल रक्तपेशी व्यवस्थित तयार होत नाहीत. फोलेटच्या कमतरतेमुळे ‘न्यूरल ट्यूब डिफेक्ट’ जसे गर्भाचे मणके व्यवस्थित तयार होत नाहीत त्यामुळे व्यंग असलेले बाळ जन्माला येऊ शकते.
व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता –
गर्भावस्थेत व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता झाल्यास लाल पेशी व्यवस्थित तयार होत नाहीत. शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता असते. यामुळे सुद्धा मज्जारज्जूंचे आजार होतात. अशा गरोदर स्त्रियांची प्रसुती अवेळी होते म्हणजेच दिवस भरण्यापूर्वी किंवा सातव्या, आठव्या महिन्यांतच होऊ शकते.
पुढील स्त्रियांमध्ये अॅनिमिया होण्याचे प्रमाण जास्त असते.
- जुळे बाळ,
- दोन बाळंतपणातलं अंतर अगदी कमी असणे,
- पहिल्या तीन महिन्यात भरपूर उलट्या होणे,
- कमी वयात गरोदर राहाणे,
- आहाराकडे लक्ष न देणे, अवेळी जेवणे, पौष्टिक अन्न न घेणे.
गर्भावस्थेत ऍनिमिया असल्यास होणारे परिणाम..?
अनेमियामुळे मुदतपूर्व प्रसुती होते. बाळाची वाढ कमी होते. अशक्त बाळ जन्माला येते, बाळाची जन्मानंतरची वाढ पण मंदगतीने होते. याशिवाय प्रसुतीदरम्यान अतिजास्त रक्तस्राव होऊन स्त्रीला अपाय होऊ शकतो. प्रसुतीनंतर नैराश्य येते. अपंग, मतिमंद बाळ जन्माला येऊ शकते.
ऍनिमिया कसा ओळखायचा..?
अशक्तपणा जाणवणे, वरचेवर चक्कर येणे, थोडे अंतर गेल्यावर थकवा जाणवणे, छातीचे ठोके वाढणे, त्वचा, नखा फिकट दिसू लागतात, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे. सुरुवातीला जास्त त्रास होत नाही. पण, हळूहळू त्रास जाणवायला सुरुवात होते. याशिवाय रक्ताची चाचणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमिया आहे की नाही ते तपासता येते.
हिमोग्लोबिन कसे तपासले जाते..?
रक्ताची छोटीशी चाचणी करून हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते. याचबरोबर जर हिमोग्लोबिन खूप कमी असेल तर शरीरातील लोहाचे प्रमाणही तपासले जाते.
हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि स्थिती –
- नॉर्मल प्रमाण – 12 ते 14 gm/dl
- सौम्य (माईल्ड) अॅनिमिया – 10 ते 10.9 gm/dl
- मध्यम (मॉडरेट) अॅनिमिया – 7 ते 10 gm/dl
- तीव्र प्रकारचा अॅनिमिया – सातपेक्षा कमी प्रमाण असते.
ऍनिमिया आणि उपचार :
मुख्य कारण जाणून घेतले जाते. त्यानुसार ट्रिटमेंट दिली जाते. आपल्याकडे मुख्यत: लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. योग्य आहार घेतल्यास अॅनिमियापासून सुटका होण्यास मदत होते. लोहाची कमतरता अयोग्य आहारामुळे होते.
त्यासाठी गरोदर स्त्रीने खालील लोहयुक्त आहार घेणे गरजेचे असते.
- मटण, अंडी, मासे
- हिरव्यागार पालेभाज्या – पालक, ब्रोकोली,
- गूळ, खजूर, तीळ, डाळी, कडधान्ये,
- व्हिटामीन-C युक्त फळे – संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, किवी, टोमॅटो इत्यादी आहार घ्यावा.
गरोदरपणात लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. गरोदर स्त्रीने त्या गोळ्या खाल्या पाहिजेत. अॅनिमिया तीव्र असेल तर आयर्नची इंजेक्शन सलाईनद्वारे दिली जातात. हिमोग्लोबिन पाचपेक्षा कमी असेल तर डायरेक्ट पेशी किंवा रक्त देणे गरजेचे असते.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
Read Marathi language article about Anemia in Pregnancy; Prevention and Treatment. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.