बाळाची मालिश (Baby massage) :
नवजात बाळाच्या आरोग्यासाठी, आईचे दूध जसे महत्त्वाचे असते तसेच बाळासाठी मसाज करणेही फायदेशीर असते. बाळाला मसाज केल्याने त्याची शारीरिक वाढ व विकास योग्यरीत्या होण्यास मदत होते. याठिकाणी बाळाला कशाप्रकारे मालिश करावी याविषयी माहिती दिली आहे.
बाळाला मसाज करण्याचे फायदे :
• बाळाचे स्नायू (मांसपेशी) मजबूत होण्यास मदत होते.
• शरीरात रक्त संचरण योग्यरीत्या होते.
• बाळाची पचनक्रिया, श्वसनक्रिया सुधारते.
• बाळाला गॅसेस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास ते त्रास कमी होतात.
• बाळाला चांगली झोप येते.
• बाळाला नियमित मसाज केल्याने त्याची शारीरिक वाढ व विकास योग्यरीत्या होण्यास मदत होते.
बाळाचा मसाज कधीपासून सुरू करावा..?
बाळाची मालिश जन्मानंतरच्या चार आठवड्यांनंतर सुरू केली जाऊ शकते, कारण या काळात बाळाची त्वचा योग्य प्रकारे विकसित झालेली असते तसेच या काळापर्यंत बाळाच्या बेंबीची जखमही सुखलेली असते.
बाळाची मालिश केंव्हा करावी..?
बाळाच्या अंघोळीपूर्वी सकाळी किंवा संध्याकाळी आपण मालिश करू शकता. मालिश व आंघोळीनंतर बाळास छान झोप येत असते. त्यामुळे जर रात्री बाळ झोपत नसल्यास, ते रडत असल्यास अशावेळी संध्याकाळी मालीश करणे फायदेशीर ठरते.
लहान बाळाचा मसाज असा करावा :
बाळाला मसाज करण्यासाठी आयुर्वेदिक बेबी मसाज तेल उपयुक्त असते. हे तेल थोडे कोमट करून वापरावे. थोडे थोडे तेल आपल्या हातावर घेऊन ते बाळाचे तळवे, पाय, हात, पोट, छाती यावर लावून हलकीशी मालीश करावी. त्यानंतर पाठ व मानेवरही अशाप्रकारे हळुवार मालीश करावी. मालीश केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घालावी.
बाळाला मसाज करताना अशी घ्यावी काळजी :
• बाळाचे शरीर हे नाजूक असते त्यामुळे हळुवार मालीश करणे आवश्यक असते.
• जास्त जोर लावून मसाज करू नये.
• चेहऱ्यावर मालीश करताना तेल बाळाच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. तेल डोळ्यात गेल्यास त्यामुळे जळजळ होऊ शकते.
• दूध पिल्यानंतर लगेच मालिश करू नये. बाळास दूध दिल्यानंतर अर्ध्या तासाने मसाज करू शकता.
• पोटावर बेंबीच्या ठिकाणी जास्त मालिश करू नये.
• बाळाच्या त्वचेवर काही ऍलर्जी किंवा रॅश येत असल्यास मालिश करू नये.
• बाळास ताप आला असल्यास मालिश करू नये.
Read Marathi language article about Baby massage: tips and benefits. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.