काळे मनुका – Dry Black currant :
सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचे फळ म्हणजे काळ्या मनुका हे आहे. द्राक्षे ही हिरवी, काळी, तांबूस अशा वेगवेगळ्या रंगाची असतात. यापैकी काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषकघटकांनी युक्त असतात.
काळ्या मनुकात एन्थोकाइनिन्स (anthocyanins), पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक एसिड (GLA), पोटशियम, लोह,
मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषकघटक असतात. काळ्या मनुकामुळे रक्त प्रवाह वाढतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच काळ्या मनुका ह्या हृदय, डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी फायदशीर असतात.
काळ्या मनुका खाण्याने रक्तात गुठळ्या होत नाही, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काळ्या मनुका खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते, अशक्तपणा दूर होतो, नियमित पोट साफ होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, ब्लड शुगर आटोक्यात राहते, पित्ताचा त्रास कमी होतो.
काळे मनुके खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे :
1) हृद्यविकाराचा धोका कमी करते..
काळ्या मनुकात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम हृदयाला बळ देते व हृदय विकारांचे प्रमाण कमी करते. याशिवाय काळ्या मनुकात असणाऱ्या Resveratrol ह्या घटकामुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो, रक्तात गुठळ्या होत नाही, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने काळ्या मनुकामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
2) रक्तदाब नियंत्रित ठेवते..
काळ्या मनुकात पोटॅशियम आणि GLA चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज काळ्या मनुका खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते.
3) हिमोग्लोबिन व रक्त वाढवते..
काळ्या मनुक्यात लोह व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून त्यात थोडासा लिंबूरस घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावेत. यामुळे रक्तारील हिमोग्लोबिन वाढते त्याचबरोबर रक्त शुद्ध होते आणि रक्ताचे प्रमाणही वाढते.
4) डोळ्यांचे आरोग्य सुधारते..
काळ्या मनुकामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक असतात. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत नाही त्यामुळे अकाली अंधत्व येण्यापासून बचाव होतो.
5) डायबेटीससाठी योग्य..
काळ्या मनुकातील Pterostilbene हा घटक डायबेटीसमध्ये उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. शिवाय काळ्या मनुकांचा Glycemic index 70 पेक्षाही कमी असल्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य ठरतात. [1]
6) अशक्तपणा दूर होतो..
दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाल्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, व्हिटॅमिन-A, विविध मिनरल्स यासारखे अनेक पोषकघटक असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
7) पोट साफ होते..
काळ्या मनुका सारक गुणांच्या असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 मनुका पाण्यात भिजवून रात्री खाल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते.
8) पित्त कमी करते..
काळ्या मनुका ह्या पित्तशामक गुणांच्या असतात. त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाणे उपयुक्त ठरते.
9) मेंदूसाठी उपयुक्त..
काळे मनुका खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव, नैराश्य दूर करण्यासही काळ्या मनुका उपयुक्त ठरतात.
10) वंध्यत्व समस्येवर उपयुक्त..
काळ्या मनुका वृष्य गुणांच्या असल्यामुळे पुरुषांमध्ये शुक्रधातुचे प्रमाण वाढवतात तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या विकारात उपयुक्त ठरतात. काळ्या मनुका नियमित खाण्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. पाळीच्या वेळी रक्त जास्त जाणे, अशक्तपणा येणे, स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात.
काळे मनुके कसे खावे..?
सुक्या मेव्यातील काळ्या मनुका तशाही खाऊ शकतो किंवा 10 ते 12 काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुका उपाशीपोटी खाणे जास्त लाभदायी ठरते.
काळे मनुके भिजवून खाण्याचे फायदे –
- भिजवलेले काळे मनुका खाल्याने रक्तदाब आटोक्यात राहतो.
- यातील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते.
- वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
- यातील व्हिटॅमिन्स B व C मुळे इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) वाढते.
- हिमोग्लोबिन वाढते व ऍनिमियापासून दूर राहण्यास मदत होते.
- हाडांचे आरोग्य चांगले राहते.
काळ्या मनुका खाण्याचे तोटे –
काळ्या मनुका पौष्टिक असतात. मात्र काही जणांना काळ्या मनुका खाण्यामुळे त्रास होऊ शकतो. काळे मनुका खाण्यामुळे रक्त पातळ होत असते त्यामुळे ब्लिडिंग संबंधित आजार असल्यास किंवा एखाद्या मोठ्या ऑपरेशननंतर सुरवातीचे काही दिवस काळ्या मनुका खाऊ नयेत. कारण रक्तस्राव होण्याची शक्यता असते. तसेच लो ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनीही काळ्या मनुका खाऊ नयेत. कारण काळ्या मनुका खाल्याने रक्तदाब कमी होत असतो.
काळ्या मनुकातील पोषकघटक (Nutrition Facts) –
एक कप काळ्या मनुकात पुढीलप्रमाणे पोषकतत्वे असतात.
ऊर्जा – 408 कॅलरीज
फॅट – 0.4 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0 मिलीग्राम
कर्बोदके – 107 ग्रॅम
फायबर – 9 .8 ग्रॅम
साखर – 9.7 ग्रॅम
प्रथिने (प्रोटीन) – 5.9 ग्रॅम
सोडियम – 12 मिलीग्राम
पोटॅशियम – 1284 मिलीग्राम
व्हिटॅमिन ए – 2.1%
व्हिटॅमिन सी – 11%
कॅल्शियम – 9.5%
लोह (आयर्न) – 26%
हे सुद्धा वाचा – जवस खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Dry Black raisins Health benefits and side effects. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.