
नऊ महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी नऊ महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली आहे.
नऊ महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 7.2 ते 10.9 किलो आणि उंची 74 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 6.4 ते 10.2 किलो असते आणि उंची सुमारे 71 सेमी पर्यंत असू शकते.
नऊ महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
• बाळ रांगायला लागते.
• खेळण्यांची आवड दाखवते.
• खेळणी हातात घेऊन त्याने खेळते.
• बॉल फेकते.
• खेळणी तोंडात घालते.
• अक्षरे जोडून बोलू लागते.
• बाबा, काका, मामा, टाटा, दादा असे शब्द बोलू लागते.
• बाळ उभे राहण्याचा प्रयत्न करते.
नऊ महिन्याच्या बाळाचा आहार असा असावा :
या वयातील बाळांसाठी दिवसातून तीन ते चारवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून तीन ते चार वेळा मऊ आहार बाळास भरवावा.
• कुस्करलेली डाळ भात वरण, कुस्करलेली भाजी आहारात असावी.
• भात, नाचणी, ओट्स ही धान्ये व डाळी शिजवून थोडे मऊ करून बाळास भरवावे.
• दहीभात, वरणभातात तूप घालून भरवू शकता.
• मऊ शिरा किंवा उपमा, खिचडी बाळास भरवावी.
• गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा.
• बाळाच्या आहारात तूप, लोणी असे दुधाचे पदार्थ समाविष्ट करावेत.
• केळे, आंबा, टरबूज, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास भरवावा.
नऊ महिन्याच्या बाळाचे लसीकरण :
नऊ महिने पूर्ण झाल्यावर बाळाला खालील दोन लसी दिल्या जातात.
• गोवर – जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर ही लस बाळाच्या उजव्या दंडाच्या वरच्या बाजुला टोचली जाते.
• व्हिटॅमिन A – जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर व्हिटॅमिन A चा पहिला डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो.
नऊ महिन्याच्या बाळाची झोप :
नऊ महिन्याचे बाळ साधारण 10 ते 14 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
नवव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
नवव्या महिन्यात बाळ रांगायला लागते. त्यानंतर हळूहळू ते आधाराला धरून उभे राहण्याचा प्रयत्न करीत असते. अशावेळी बाळाला उभे राहण्यासाठी आपल्या हातांचा आधार आपण देऊ शकता. याशिवाय,
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
• पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
बाळाला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)
सायनसचा त्रास होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Sinusitis in Marathi