चार महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लेखात चार महिन्याच्या बाळाला कोणता आहार द्यावा, त्याला काय खाऊ घालायचे तसेच या महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
चार महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 5.6 ते 8.6 किलो आणि उंची 65 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 5.1 ते 8.0 किलो असते आणि उंची सुमारे 63 सेमी पर्यंत असू शकते. वयानुसार बाळाचे वजन व उंची किती असावी ते जाणून घ्या..
चार महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
- खेळणी पकडण्यासाठी हात पुढे करत असते.
- आवाजाकडे लक्ष दते.
- बाळाला पालथे झोपविल्यास ते आपली डोके वर उचलते.
- बाळाला बोलाविल्यास आनंदाने हुकार देते, हसते.
- आसपासच्या लोकांना ओळखते.
चार महिन्याच्या बाळाचा आहार असा असावा :
पहिले सहा महिने नवजात बालकाचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे चौथ्या महिन्यातही बाळाला स्तनपान करावे. चार महिन्याची बालके दिवसभरात 8 ते 10 वेळा स्तनपान करू शकतात. आईचे दुध सोडून बाळास इतर कोणताही आहार 4थ्या महिन्यात देऊ नये. त्यामुळे बाळास पाणी, ग्राईप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गुटी वैगरे काहीही देऊ नये.
काही परिस्थितीत बाळास आईचे दूध देता येत नसल्यास पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. चौथ्या महिन्यात फॉर्म्युला दूध देताना बाळाला सहा ते सात वेळा थोडे थोडे फॉर्म्युला दूध दिले पाहिजे.
चार महिन्याच्या बाळाची झोप :
चार महिन्याचे बाळ 12 ते 15 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
चार महिन्याच्या बाळाचे लसीकरण :
चौथ्या महिन्यात बाळाला साडेतीन महिने किंवा 14 आठवडे पूर्ण झाल्यावर खालील दोन लसी दिल्या जातात.
- पोलिओ (3) – बाळाला साडेतीन महिने पूर्ण झाल्यावर पोलिओचा तिसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
- डी.पी.टी. (3) – बाळाला साडेतीन महिने पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा तिसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
चौथ्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
चौथ्या महिन्यातही बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलण्यासाठी हळूहळू प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्याची मान, पाठ खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते तसेच बाळ पालथे होण्यास शिकते. याशिवाय,
- अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
- बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
- बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
- बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
तिसऱ्या महिन्यात बाळ दूध पीत नसल्यास किंवा त्याला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
हे सुध्दा वाचा – 5 महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून जाणून घ्या.
Read Marathi language article about 4 months baby care, weight and diet plan. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.